Join us

खारेपाट महोत्सवाला कलाकार लावतील चार चाँद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2016 11:56 AM

खारेपाटातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन झेप या संस्थेने खारेपाट महोत्सव ही अभिनव कल्पना राबवून सगळ्यांसमोर एक आदर्श ...

खारेपाटातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन झेप या संस्थेने खारेपाट महोत्सव ही अभिनव कल्पना राबवून सगळ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे. २०१२ आणि २०१३ मध्ये लाखो लोंकांचा भरगोस प्रतिसाद मिळवून खारेपाट महोत्सव यंदा ३ ºया वर्षात पदार्पण करत आहे आणि यावर्षी खारेपाटचा भव्य महोत्सव द्रोणागिरी, तिनवीरा पेण अलिबाग रोड, अलिबाग येथे २० ते २५ डिसेंबर २०१६ दरम्यान संपन्न होणार आहे. या महोत्सवाला मराठी सिनेसृष्टीतील काही आघाडीचे कलाकार भरत जाधव, भाऊ कदम, श्रेया बुगडे, शर्वरी जेमेनीस, गायिका वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि गायक राहुल सक्सेना महोत्सवाला चार चाँद लावणार आहेत.  महिलांच्या बचत गटांना, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी आणि खारेपाटातील संस्कृतीचे जगाला दर्शन व्हावे या उद्देशाने खारेपाट महोत्सवाचे आयोजन होत असते. त्याचबरोबर परिसरातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं हा देखील खारेपाट महोत्सवाचा उद्देश आहे. संस्कारमय मनोरंजनाचा एक निखळ आनंद हा खारेपाट महोत्सव देऊन जातो. या वर्षीच्या खारेपाट महोत्सवाची तयारी खूप जय्यत प्रकारे चालू आहे. यंदा हा महोत्सव २,२५,००० चौरस फूट क्षेत्रात साकारला जाणार असून यावेळी खारेपाटचं वैशिष्ट म्हणजे विविध कार्यक्रमासाठी अत्याधुनिक आॅडिटोरियम, ६५० पेक्षा जास्त कलाकार आणि १५० पेक्षा जास्त तंत्रज्ञ, लेटेस्ट अल्ट्रा मॉडर्न आॅडिओ व्हिज्युअल्स आणि आकर्षक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच  सेल्फीचे आकर्षण पाहता सेल्फी पॉईंट्सदेखील ठेवण्यात आली आहे. कला, क्रीडा, संस्कृती आणि मनोरंजन यांचा परिपूर्ण संगम असलेल्या अशा या खारेपाट महोत्सवाला फक्त रायगडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने भेट द्यावी असे आवाहन झेप संस्थेच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांनी केले आहे.