जीवन जगत असताना शालेय जीवनापासून मित्र किंवा मैत्रीण हे आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. अशाच दहावीतील मित्रांची व पुढे कॉलेजच्या काळात घडणाऱ्या मैत्रीची व प्रेमाची अनोखी व्याख्या सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'फ्रेंडशीप Vs लव्ह'.
या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या तालीम हॉलमध्ये पार पडला. यावेळी या चित्रपटाचे कॅमेरामन योगेश अंधारे,लेखक आशिष निनगुरकर,अभिनेता गौरव मोरे, प्रदीप कडू, अजित वसंत पवार,सुनील जाधव, कलादिग्दर्शक चंद्रकांत कुटे,निर्मिती व्यवस्थापक प्रतिश सोनवणे,सहाय्यक दिग्दर्शक स्वप्नील निंबाळकर,सहाय्यक निर्मिती व्यवस्थापक किरण निनगुरकर व स्टील फोटोग्राफर सिद्धेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
ऑनलाइन जमान्यात कुठेतरी मैत्रीचा संवाद हरवत चालला आहे.मोबाईलवर ही पिढी वावरतांना मैदानी खेळ मागे पडत आहेत. अशातच प्रेमाची संकल्पना देखील बदलली आहे.केवळ आकर्षण हेच प्रेम समजले जात आहे.त्यावरच आधारित अशा तरुणाईच्या अंतर्मनात साद घालणारा व मनोरंजनात्मक पद्धतीने वस्तुस्थिती मांडणारा 'फ्रेंडशीप Vs लव्ह' या सिनेमाची निर्मिती अभिलाषा फिल्म्स व काव्या ड्रीम मुव्हीज यांच्या सहयोगाने होत असल्याची माहिती मार्गदर्शक अशोक कुंदप यांनी दिली.यावेळी लेखक आशिष निनगुरकर यांनी स्क्रिप्टचे वाचन केले.आजच्या तरुणाईला वेड लावणारा हा सिनेमा नक्की यशस्वी होईल,असे प्रतिपादन कलादिग्दर्शक व मार्गदर्शक चंद्रकांत कुटे यांनी यावेळी केले.सर्व मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अनेक दिग्गज कलावंत काम करीत असलेल्या या सिनेमाचे शुटिंग लवकरच सुरू होणार आहे.