मराठी कलाविश्वातील विनोदाचा बादशाह म्हणजे अशोक सराफ (Ashok Saraf). कधी नायक,कधी खलनायक तर कधी विनोदी भूमिका साकारुन अशोक सराफ यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांच्या कित्येक भूमिका गाजल्या. मात्र, गेल्या काही काळात त्यांचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. परंतु, त्यांच्याविषयी रंगणाऱ्या चर्चा अजूनही कायम आहेत. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारे अशोक सराफ त्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळेही ओळखले जातात. सध्या त्यांचा असाच एक किस्सा चर्चिला जात आहे. कोल्हापुरातील अनेक तरुणांना त्यांनी रोजगार मिळवून दिला होता.
निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्या 'मी बहुरुपी' या पुस्तकामध्ये त्यांचा अभिप्राय मांडला आहे. यावेळी कोल्हापुरातील गरजू तरुणांच्या मदतीला अशोक सराफ कसे धावून गेले होते हे त्यांनी सांगितलं आहे. सोबतच एक जुना किस्सादेखील त्यांनी शेअर केला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील 'या' गोष्टीची अशोक मामांना आजही वाटते खंत; म्हणाले...
"कोल्हापुरात शुटिंग बंद झाल्यामुळे तेथील स्पॉट बॉईजच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या मुलांच्या मदतीला अशोक सराफ धावून गेले होते. त्यावेळी जर कोणाला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा घ्यायची असेल तर त्याला रिक्षा घेऊन दिली. इतकंच नाही तर रिक्षाचा पहिला हप्तादेखील त्यांनीच भरला. विशेष म्हणजे कोणाला दुकान सुरु करायचं असेल तर त्यासाठी भांडवलसुद्धा दिलं", असं निवेदिता सराफ यांनी सांगितलं.
अभिनेता होण्यापूर्वी अशोक सराफ करायचे 'या' क्षेत्रात काम; सहकाऱ्यांमुळे सोडली पहिली नोकरी
दरम्यान, अशोक सराफ यांचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र प्रेक्षकांमध्ये त्यांची कायम चर्चा रंगत असते. इतकंच नाही तर उत्तम अभिनयासह त्यांच्या मनमिळाऊ, इतरांना मदत करायची भावना यामुळेही ते कायम चर्चेत येत असतात. यापूर्वीही त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांनाही मदत केली आहे.