छोट्या पडद्यावरील एकेकाळी सोनपरी ही मालिका खूप गाजली होती. या मालिकेतील सोनपरी आणि फ्रुटीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. भलेही ही मालिका बंद होऊन बराच काळ उलटला असला तरी आजही या मालिकेतील काही कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहेत. या मालिकेत फ्रुटीची भूमिका अभिनेत्री तन्वी हेगडे हिने साकारली होती. आता तन्वी खूपच वेगळी दिसते. लवकरच ती एका मराठी चित्रपटात दिसणार आहे.
अभिनेत्री तन्वी हेगडे हिने आजवरच्या कारकिर्दीत फार चित्रपट केले नाहीत. मोजक्या मालिका आणि चित्रपटांमध्ये तन्वीने साकारलेल्या व्यक्तिरेखा रसिकांच्या हृदयात घर करणाऱ्या ठरल्या आहेत. 'अलिप्त' या आगामी मराठी चित्रपटाद्वारे तन्वीने पुन्हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. २९ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्माते अनिकेत विनायक कारंजकर यांनी 'कटिंग चाय प्रॉडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत 'अलिप्त' या चित्रपटाची निर्मिती केली असून 'संजू एंटरटेनमेंट'चे संजय लक्ष्मणराव यादव हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. दिग्दर्शक मनोज सुधाकर येरुणकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. स्वप्नील प्रकाश जाधव यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन केलं असून, तन्वीसोबत मुख्य भूमिकाही साकारली आहे.
'जान की कसम' आणि 'गज गामिनी' या चित्रपटांमध्ये तन्वी बालकलाकाराच्या रूपात झळकली. त्यानंतर 'राहुल', 'पिता', 'विरुद्ध', 'वाह! लाईफ हो तो ऐसी', 'चल चले', 'धुरंधर भाटवडेकर', 'अथांग', 'शिवा' या चित्रपटांसोबतच 'शाका लाका बूम बूम' आणि 'सोन परी' या मालिकांमध्ये अभिनय केला आहे. 'अलिप्त बाबत तन्वी म्हणाली की, ज्या चित्रपटांमधील कॅरेक्टर्स माझ्या मनाला भिडतात तेच मी स्वीकारते. दिग्दर्शक मनोज येरुणकर यांनी जेव्हा 'अलिप्त'चे कथानक ऐकवले, तेव्हा त्यात नावीन्याच्या विविध छटा जाणवल्या. माझ्या व्यक्तिरेखेतील नाना पैलूंची जाणीव झाली. त्यामुळे 'अलिप्त'ला नकार देण्याचे कारणच नव्हते. कॅरेक्टर आणि कथानकाबाबत जास्त काही रिव्हील करता येणार नाही. या चित्रपटात काम करताना एका प्रोफेशनल युनिटसोबत मनासारखे काम करायला मिळाल्याचे समाधान लाभले. या चित्रपटाच्या शीर्षकासोबत देण्यात आलेली 'भूतकाळातील खुणा वर्तमानात अलिप्त होत नाहीत, तर त्या पुन्हा जन्म घेतात...' ही टॅगलाईन खूप महत्त्वाची असून, कथानकाचा गाभा सांगणारी आहे. स्वप्नीलसह इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही आनंददायी होता असं तन्वी म्हणाली.
स्वप्नील आणि तन्वीसोबत या चित्रपटात शरयू सोनावणे, भूषण घाडी, सुनील देव, सुशांत शेलार आदी कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. डीओपी अनिकेत कारंजकर यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. स्वप्नील आणि जन्मेजय पाटील यांनी गीतलेखन केलं आहे, तर संगीतकार राजेश सावंत यांनी गीतांना स्वरसाज चढवला आहे. दिलीप मेस्त्री यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून, कला दिग्दर्शन महेंद्र शिव मंगल अप्पा राऊत यांनी केलं आहे. संकलन हर्षद वैती यांनी केलं असून, अप्पा तारकर यांनी ध्वनी आरेखनाचे काम पाहिलं आहे. अभय मोहिते यांनी कलाकारांना रंगभूषा, तर प्रतिभा गुरव यांनी वेशभूषा केली आहे. पार्श्वसंगीत, फॉली आणि ध्वनी मिश्रण ही ट्रिपल रिस्पॅान्सिबिलीटी लोकेन यांनी सांभाळली आहे. एस. नंदागवले यांनी कार्यकारी निर्माते या नात्याने काम पाहिले आहे.