Join us  

रेड्याने जुळवली लग्नगाठ! 'गाभ' सिनेमात दिसणार अनोखी प्रेमकथा, कैलास वाघमारे मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 5:52 PM

'गाभ' हा नवा कोरा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

आजवर लव्हस्टोरी असलेले अनेक मराठी आणि बॉलिवूड सिनेमे गाजले. या सिनेमांत हिरो-हिरोईनचं प्रेम जुळवण्यासाठी अनेक युक्त्याही लढवल्या गेल्याचं पाहायला मिळालं. आता चक्क एक रेडा दोन प्रेमी युगुलांची लव्हस्टोरी पूर्ण करताना दिसणारा आहे. 'गाभ' हा नवा कोरा मराठीसिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

असं म्हणतात कि,‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात’ मात्र ‘गाभ’ चित्रपटात चक्क एक रेडा अनोखी रेशीमगाठ जुळवणार आहे. या सिनेमात अभिनेता कैलास वाघमारे आणि अभिनेत्री सायली बांदकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कैलास या सिनेमात दादू तर सायली बांदकर फुलवाच्या भूमिकेत आहे. या दोघांच्या प्रेमामध्ये रेडा कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो याची रंजक कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने कैलास वाघमारे  व सायली बांदकर ही फ्रेश जोडी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे आहेत. सहनिर्माते अनुप जत्राटकर आहेत. कैलासचा रोमँटिक अंदाज त्याच्या ‘दादू’ या व्यक्तिरेखेतून पहायला मिळणार आहे. ‘गाभ’ चित्रपटात या दोघांसोबत विकास पाटील, उमेश बोळके, वसुंधरा पोखरणकर, श्रद्धा पवार, चंद्रशेखर जनवाडे यांच्या भूमिका आहेत.  छायाचित्रण वीरधवल पाटील यांचे तर संकलन रविंद्र चांदेकर यांचे आहे. गीते आणि संगीत आणि साउंड डिझाइनची जबाबदारी चंद्रशेखर जनवाडे यांनी सांभाळली असून पार्श्वसंगीत रविंद्र चांदेकर यांचे आहे. आनंद शिंदे, प्रसन्नजीत कोसंबी, सावनी रविंद्र यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्याची  गावच्या रांगड्या मातीच्या  पार्श्वभूमीवरील ‘गाभ’  ही  कथा  आपल्याला  नक्कीच  भावेल.  २१  जूनला ‘गाभ’ सर्वत्र प्रदर्शित  होणार आहे.

टॅग्स :मराठीसिनेमामराठी अभिनेतामराठी चित्रपट