Join us

श्रेयसच्या घरी बाप्पाचं आगमन होतं पण विसर्जन होत नाही; अभिनेता मूर्तीचं नेमकं काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 11:57 AM

Shreyas talpade: वडिलांच्या निधनानंतर श्रेयसने बाप्पाला घरी आणणं बंद केलं होतं. मात्र...

सध्या सगळ्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. अनेकांच्या घरी, गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. यामध्ये कलाविश्वातील काही कलाकारांच्या घरीही बाप्पाचं आगमन होतं.  यात सध्या अभिनेता श्रेयस तळपदे याच्या घरचा बाप्पाची चर्चा रंगलीये. श्रेयसच्या घरी दरवर्षी गणरायाचं आगमन तर होतं. पण, त्याचं विसर्जन कधीच होत नाही. यामागचा एक किस्सा आणि ही परंपरा कशी सुरु झाली हे श्रेयसने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.

"मी नवीन घर घेतलं तेव्हा आम्ही ठरवलं होतं की घरी बाप्पाचं आगमन करायचं. आम्ही सलग सात वर्ष दीड दिवसांचे बाप्पा घरी आणले. पण मधल्या काळात माझे बाबा वारले. तेव्हा मी फार चिडलो होतो. ज्या पद्धतीने हे सगळं घडलं. ते माझ्यासाठी फारच धक्कादायक होतं. त्यामुळे मी चिडून यापुढे गणपती बसवायचा नाही असं ठरवलं", असं श्रेयस म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ''नंतर मला मुलगी झाली. मग, आपण घरी बाप्पा आणू या का? असं तिने विचारलं. तिच्या म्हणण्यानुसार आम्ही पुन्हा बाप्पांना घरी आणायला सुरुवात केली. घरी गणपती आणल्यानंतर तिने शेजारच्यांच्या गणपतीचं विसर्जन पाहिले. आम्हीही आमच्या बाप्पाच्या विर्सजनाची तयारी केली. हौद बांधला. पण, ती घरी आली आणि आपण बाप्पाचं विसर्जन करायचं नाही असं म्हणून हट्ट करायला लागली. त्यामुळे शेवटी आम्ही गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला."

गणपतीच्या मूर्तीचं काय करतो श्रेयस?

दरम्यान, श्रेयस त्यांच्या घरी आलेल्या बाप्पाचं कधीच विसर्जन करत नाही. गणपतीचं विसर्जन करण्याऐवजी तो बाप्पाच्या पायाशी थोडीशी माती लावतो आणि ती माती विसर्जन करतो. तसंच जी बाप्पाची मूर्ती असते ती घरात ठेवतो आणि दरवर्षी त्या मुर्तीला तो रंगरंगोटी करुन पुन्हा त्या मूर्तीची पूजा करतो. 

टॅग्स :श्रेयस तळपदेगणेशोत्सवसेलिब्रिटी