Join us

Ganesh Festival 2018 : महेश सांगतोय, गणरायाच्या आगमनाची आम्ही वर्षभर वाट पाहात असतो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 4:21 PM

महेश म्हणजेच महेश ओगले त्याच्या कुटुंबियांसमवेत ठाण्यात राहातो. त्याची सासरवाडी देखील ठाण्याचीच असून त्याच्या सासू-सासऱ्यांच्या घरात 65 वर्षांपासून गणरायाचे आगमन होते.

टाइमपास, बालक पालक या चित्रपटाच्या गाण्यांनी रसिकांना अक्षरशः वेड लावले आहे. या चित्रपटांना आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांच्या आजही ओठावर रुळलेली आहेत. या चित्रपटाचे संगीत चिनार-महेश या जोडीचे आहे. याच जोडीतील महेश म्हणजेच महेश ओगले त्याच्या कुटुंबियांसमवेत ठाण्यात राहातो. त्याची सासरवाडी देखील ठाण्याचीच असून त्याच्या सासू-सासऱ्यांच्या घरात 65 वर्षांपासून गणरायाचे आगमन होते. महेशची पत्नी सोनलचे माहेरचे आडनाव पाटणकर असून पाटणकरांच्या गणपतीला त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय आवर्जून हजेरी लावतात.

महेश, त्याची पत्नी, त्याचा मुलगा हे गणपतीच्या दिवसांत पाटणकरांच्या घरी गणरायाची सेवा करायला दरवर्षी उपस्थित असतात. त्यांच्या घरातील आरती तर खूपच छान असते. त्यांची आरती ही कित्येक मिनिटांची असते असे पाटणकर कुटुंबीय सांगतात. पाटणकर कुटुंब मिळून गणरायाच्या स्वागतासाठी कित्येक दिवस आधीपासून तयारी करतात. गणरायाचे डेकोरेशन हे साधे आणि सुंदर करण्याकडे सोनलचा भाऊ अमोल आणि गौरीचा कल असतो. डेकोरेशन करताना प्रदूषणाची हानी होणाऱ्या कोणत्याही वस्तूंचा वापर ते करत नाहीत. या डेकोरेशनमध्ये ते जास्तीत जास्त फुलांचा वापर करतात. कुटुंबियांतील सगळी मंडळी डेकोरेशनसाठी आपला हातभार लावतात.

पाटणकर पूर्वी कल्याणला राहात असत. तेव्हापासून ते गणरायाची घरात स्थापन करत आहेत. ठाण्यात त्यांच्या घरी गणपतीला नेहमीच गर्दी असते. या गणरायाच्या तयारीविषयी संगीतकार महेश ओगळे सांगतो, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या पत्नीच्या घरी गणरायाची स्थापना केली जात आहे. मी कितीही कामात व्यग्र असलो तरी आम्ही सगळे गणरायाच्या दिवसांत माझ्या सासरवाडीमध्ये असतो. गणपतीच्या दिवसांत घरात लोकांची रिघ लागलेली असते. मोदक हा गणरायाचा आवडता पदार्थ या दिवसात आमच्या घरी आवर्जून केला जातो. तसेच नैवेद्यासाठी विविध पदार्थ घरात बनवले जातात. घरात डेकोरेशपासून ते जेवण बनवण्यापर्यंत सगळेच मदत करतात. या दिवसांत घर लोकांनी अक्षरशः भरलेले दिसते. त्यामुळे या सणाची आम्ही सगळे वर्षभर वाट पाहात असतो.

 

टॅग्स :चिनार-महेशगणेश चतुर्थी २०१८