अभिनेते अशोक समेळ यांच्या घरात गेल्या ७५ वर्षांपासून गणपती येतो. त्यांच्या गणपतीची ही पंचाहत्तरी असल्याने त्यांच्यासाठी यंदाचा गणपती हा खूप खास आहे. गणपतीची त्यांनी जय्यत तयारी केली असून अतिशय भक्तिभावाने त्यांचे कुटुंबीय दरवर्षी गणपतीची पूजा-अर्चना करतात. त्यांचा मुलगा संग्राम समेळ आणि सून पल्लवी पाटील हे त्यांच्या मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असले तरी त्यांनी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी खास सुट्टी घेतली आहे. समेळ कुटुंबियांकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो.
गणपतीच्या दिवसात नेहमीच त्यांचे घर नातलगांनी, मित्रमंडळींनी भरलेले असते. त्यांच्या या गणपती बाप्पाविषयी पल्लवी सांगते, बाबांच्या (अशोक समेळ) लहानपणापासून हा गणपती आमच्या घरी येतो. बाबांची नुकतीच पंचाहत्तरी झाली आणि आमच्या गणपतीचे देखील यंदाचे पंचाहत्तरावे वर्षं आहे आणि त्यामुळे आमच्यासाठी यंदाचा गणपती बाप्पा हा खूपच खास आहे. यंदा आम्ही गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसोबत एक खूपच छान गोष्ट केली आहे. गणपती आमच्या घरातील ज्या रूममध्ये विराजमान झाला आहे, त्या घरात आम्ही बाबांचे लहानपणापासूनचे अनेक फोटो ठेवले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवाद्वारे आम्ही बाबांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत आहोत. दरवर्षी आमच्या घरी गणपती असताना आम्ही कोणत्या ना कोणत्या नवीन नाटकाचे, लिखाणाचे वाचन करतो. ही प्रथा आमच्याकडे अनेक वर्षांपासून आहे. यंदा माझ्या आजेसासूंनी म्हणजेच संग्रामच्या आईच्या आईंनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्या आत्मचरित्राचे वाचन गणपतीच्या दिवसांत करण्यात आले. हा अनुभव आमच्या सगळ्यांसाठी खूप छान होता.
पल्लवी पाटील सध्या झी युवावरील बापमाणूस या मालिकेत काम करत आहे तर संग्राम समेळ स्टार प्रवाहच्या ललित २०५ या मालिकेत काम करत आहे. त्यांनी दोघांनी छोट्या पडद्यावर त्यांचे आज एक स्थान निर्माण केले आहे. आपल्या कामात कितीही व्यग्र असले तरी त्यांनी दोघांनी गणपती बाप्पासाठी दीड दिवसांची सुट्टी घेतली असून बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या कामाला लागणार आहेत.