गेल्या २० वर्षांपासून मराठी व हिंदी चित्रपट, मालिका, नाटके तसेच जाहिरातींमध्ये अभिनेते म्हणून कार्यरत असलेले गणेश मयेकर आगामी 'एक होतं पाणी' या सिनेमात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.या सिनेमात त्यांनी विविधरंगी भूमिका साकारली आहे.
'एक होतं पाणी' या चित्रपटात गणेश मयेकर यांनी विशेष आणि महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाबद्दल त्यांनी सांगितले की, 'एक होतं पाणी' चित्रपटाबद्दल मला खूप उत्सुकता आहे. कारण हा चित्रपट पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर अभिनय तसेच थोडे फार नृत्य करण्याची संधीही मला मिळाली आहे. दिग्गज अभिनेते अनंत जोग, हंसराज जगताप, जयराज नायर, दीपज्योती नाईक व रणजित जोग यांच्यासोबत माझीही तितकीच महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. त्यामुळे मला या सिनेमात काम करताना खूप मजा आली आणि आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो लेखक आशिष निनगुरकर यांनी हा चित्रपट उत्तम लिहिला आहे.
पाण्याच्या ज्वलंत समस्येवर या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. रोहन सातघरे यांनी प्रभावी दिग्दर्शन केले आहे तर योगेश अंधारे यांनी उत्तम छायाचित्रण केले आहे. चित्रपटाचे निर्माते डॉ. प्रवीण भुजबळ साहेब आणि विजय तिवारी साहेब यांच्यामुळेच हे सर्व साध्य झाले असल्याचे मयेकर यांनी सांगितले.'एक होतं पाणी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.