आतापर्यंत आपण वेगवेगळ्या धर्मावर, जातीवर चित्रित केलेले सिनेमे पाहिले. मात्र महाराष्ट्रात अशी एक जमात आहे, जी नेहमीच मागासलेली आणि सोयीसुविधांपासून वंचित राहिली आहे, ती म्हणजे आदिवासी जमात. त्यांच्या आयुष्याचे चित्रण करणाऱ्या ‘ऑनलाईन मिस्टेक’ या मराठी सिनेमाचे चित्रीकरण सध्या यवतमाळमधील पुसद, उमरखेड आणि कृष्णापूर गावात सुरू आहे. आस्क मोशन फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर असून त्यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्याचबरोबर ते स्वत: आदिवासी कुटुंबातले आहेत. डॉ. राज माने आणि विनोद संतोषराव डवरे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
समाजाने दुर्लक्षित केल्यामुळे आदिवासी लोक कसे नक्षलवादी बनतात, या विषयावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असल्याचे चित्रपटाचे निर्माते अरुण किनवटकर यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, सिनेमातून आदिवासी समाजाची संस्कृती आम्ही दाखवणार आहोत. गाव आणि शहर या दोघांचा समन्वय यात दाखवण्यात आला आहे. निर्माता म्हणून हा माझा पहिलाच सिनेमा असल्याने अनेक गोष्टींचा सामना मला करावा लागत असला तरी गावातील ग्रामस्थ आणि मंडळीचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याने मी आनंदित आहे.
दिग्दर्शक डॉ. राज माने, विनोद डवरे यांनी यावेळी सांगितले की, ‘ऑनलाईन मिस्टेक’ हा सिनेमा आदिवासी कुटुंब आणि पाटील कुटुंब यांच्यातील नाते संबधांवर आधारित असला तरी यात अनेक उप- कथानक आहेत. वेगळी प्रेमकथा आहे, आदिवासी तरुणांना नक्षलवादाच्या वाटेवरून चांगल्या वाटेवर कसे येता येईल हे देखील आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठीतील नामवंत कलाकारांसोबत या गावातील अनेक स्थानिक कलाकरांना आम्ही सिनेमात संधी दिली आहे. सिनेमात एकूण चार गाणी आहेत. दिनेश अर्जुन यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे.
अनेक हिंदी आणि मराठी सिनेमातून हमखास दिसणारा चेहरा म्हणजे गणेश यादव. ते म्हणाले की, आजवर प्रेक्षकांनी मला खलनायकाच्या भूमिकेत पाहिले आहे, परंतु या सिनेमात मी दादासाहेब देशमुखांची भूमिका साकारतो आहे, अतिशय प्रेमळ अशी ही व्यक्तिरेखा आहे. दादासाहेबांनी आजवर अनेक आदिवासी कुटुंबीयांना मदत केली आहे. इतकेच नव्हे तर ते एका आदिवासी नक्षलवादी माणसाच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ देखील करतात. त्यांच्यात सुधारणा व्हावी यासाठीच ते नेहमी प्रयत्नशील असतात.
अभिनेते प्रल्हाद चव्हाण या सिनेमात माधवराव देशमुखांची भूमिका साकारत आहेत. ते भूमिकेविषयी सांगतात की, अतिशय मनमौजी अशी ही भूमिका आहे. आजवर मी अशी भूमिका साकारलेली नाही.
विशाल पाटील हा सिनेमाचा नायक आहे. माधवरावच्या मुलाची म्हणजेच मोहितची भूमिका तो साकारतो आहे. अदिती कामले नायिकेच्या भूमिकेत आहे, ती सुबी ही व्यक्तिरेखा साकारते आहे.