Join us

'बेधडक' मध्ये गणेश यादव सकारात्मक भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 9:44 AM

अनेक हिंदी मराठी चित्रपटांतील नकारात्मक भूमिकांतून आपल्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटवलेले अभिनेता गणेश यादव आता एका सकारात्मक भूमिकेत दिसणार ...

अनेक हिंदी मराठी चित्रपटांतील नकारात्मक भूमिकांतून आपल्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटवलेले अभिनेता गणेश यादव आता एका सकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. संतोष मांजरेकर दिग्दर्शित बेधडक या चित्रपटात ते प्राचार्य असलेल्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटातून गणेश यादव यांच्या अभिनयाचं वेगळं रूप प्रेक्षकांना अनुभवता येईल. राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, गोविंद टावरे यांनी चित्रपटाचं लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. नुकताच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.गणेश यादव या चित्रपटात बॉक्सर असलेल्या मुलाच्या वडिलांची, प्राचार्य अजय सहाने ही भूमिका साकारत आहेत. बॉक्सिंगचं वेड असलेल्या मुलाला बाहेरच्या परिस्थितीची जाणीव ते करून देतात. मुलगा मात्र वडिलांचं ऐकत नाही. त्यामुळे वडील-मुलामध्ये एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो. या संघर्षाचं पुढे काय होतं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. 'बेधडक या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली. सकारात्मक विचार करणारे वडील, आजुबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे जबाबदार वडील, प्राचार्य असे वेगवेगळे कंगोरे या भूमिकेला होते. त्यामुळे ही भूमिका करताना फार छान अनुभव आला. आपल्या आजुबाजूला वडील-मुलांमध्ये संघर्ष होताना दिसतो. त्याचं काहीसं प्रतिबिंब या चित्रपटात आहे. मात्र, त्याही पलीकडे जाऊन हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा आहे,' असं गणेश यादव यांनी सांगितलं. वडील-मुलाच्या संघर्षाची पार्श्वभूमी असलेला "बेधडक" हा चित्रपट नक्कीच चित्रपटगृहात जाऊन पहायला हवा.  राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांनी चित्रपटाचं लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटानंतर त्यांनी 'सुराज्य' हा अॅक्शनपॅक्ड हा चित्रपट केला होता. आता 'बेधडक' या चित्रपटातून बॉक्सिंग या खेळावर आधारित कथानक हाताळलं आहे.