Join us

कसा बाप्पा तू गोजिरा वाटतो... गणेशोत्सवात वंदना गुप्ते यांचं स्पेशल गाणं, ऐकलंत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 10:14 AM

वर्षभर प्रसन्न आणि मंत्रमुग्ध करणारी बाप्पाची गाणी म्हणजे गणेशभक्तांचा जिव्हाळ्याचा विषय.

Ganeshostav 2024 : गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया... घरोघरी बाप्पा विराजमान झाले असून संपुर्ण महाराष्ट्रात आनंदात आणि जल्लोषाचे वातावरण आहे. कुठे घराघरातून आरती आणि टाळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. तर कुठे चौका-चौका बाप्पाची गाणी लावली आहे. पार्वतीच्या बाळा, माझ्या गणाने घुंगरू हरवले, गणपती माझा नाचत आला, अशी चिकमोत्याची माळ अशी गणपतीवरील लोकप्रिय गाणी दरवर्षी आपल्याला ऐकायला मिळतात. या गाण्यामध्ये आणखी एका गाण्याची भर पडली आहे ते म्हणजे 'पार्वती नंदना' हे गाणे. 

अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं बाप्पा स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  वंदना गुप्ते आणि  गायिका उत्तरा केळकर या जोडीचा 'पार्वती नंदना' हा सोलो अल्बम नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या गाण्यात आजी आणि नातवाचं बाप्पाप्रती असलेले प्रेम दिसून येतंय.  कौतुक शिरोडकर यांच्या लेखणीतून सजलेल्या या गाण्याला गायिका उत्तरा केळकर, बालगायक आदित्य.जी. नायर यांचा स्वरसाज लाभला आहे.  प्रवीण कुंवर यांचे संगीत आहे. गुरु नायर प्रॉडक्शन्स या अल्बमचे निर्माते आहेत. 

या गाण्याबद्दल बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या, "पिढी मागोमाग पिढी बदलत जाते, काळ पुढे सरकत जातो. पण आपण अनुभवलेल्या एक एक गोष्टी पुढच्या पिढीच्या पदरात टाकताना अनुभवाचे गाठोडे अलगद सोडवावे लागते. तरच त्या अनुभवाचा गोडवा पुढच्या पिढीला चाखता येतो. गणपती उत्सवाच्या याच आनंददायी सोहळ्याचं महत्त्व आपल्या नातवाला गाण्यातून समाजवणारी आजी या गाण्यात दिसणार आहे. गणेशोत्सव हा कुटुंबांना बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. हे गाणं करताना या सगळ्याचं समाधान नक्कीच जाणवलं".  

कलेची आराधना ही गणपतीची आराधना केल्यासारखी असते, त्यामुळे एक छान गाणं गायला मिळाल्याचं  उत्तरा केळकर यांनी म्हटलं. तर  चांगल्या  टीमसोबाबत श्रीगणेशाचं गीत करण्याचा योग जुळून आला, हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास निर्माते गुरु नायर यांनी व्यक्त केला. कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणेशाचे वंदन करुनच करतो. गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद व उल्हासाचे प्रतीक आहे. या दिवसात प्रत्येकामध्ये एक उत्साह पहायला मिळतो.  

टॅग्स :वंदना गुप्तेगणेशोत्सव 2024