मराठी इंडस्ट्रीतील अतिशय देखणे अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं ११ जुलै रोजी निधन झालं. ते तळेगाव येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच राहायचे. त्यांचं निधन होऊन दोन दिवस झाले तरी कोणालाच थांगपत्ता लागला नव्हता. यावरुन त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनीला (Gashmeer Mahajani) प्रचंड ट्रोल केले गेले. रवींद्र महाजनी यांच्या निधनाला आता १ महिना उलटून गेला आहे. गश्मीर अजूनपर्यंत माध्यमांसमोर आलेला नाही मात्र तो इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांशी संवाद साधत असतो.
नुकतंच गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'आस्क गश' हे सेशन घेतलं. यामध्ये त्याने परत काम कधी सुरु करणार? कठीण परिस्थितीला कसा सामोरा गेलास? आईची तब्येत कशी आहे? अशा काही प्रश्नांना उत्तरं दिली. दरम्यान एका चाहत्याने त्याच्या लहानपणीच्या आठवणींबाबत विचारलं. 'तुम्ही लहानपणी काय बनायचं ठरवलं होतं? असा प्रश्न एकाने विचारला. यावर गश्मीर म्हणाला, 'लहानपण फारसं आठवत नाही मी'.
गश्मीरच्या या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गश्मीरवर खूप लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्यांच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा होता. त्याची आईही नोकरी करत होती मात्र पगार तुटपुंजा होता. वडिलांना यातून मुक्त करण्यासाठी त्याने वयाच्या १५ व्या वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली. तो उत्तम डान्सर आहे. त्याने डान्स अकादमी सुरु करुन त्यातून आलेल्या पैशातून आणि नाटक सिनेमातून कर्ज फेडलं. अवघ्या २ वर्षांमध्ये गश्मीरच्या डान्स अकादमीने चांगला जम बसवला आणि गश्मीरने घरावरचं सगळं कर्ज फेडलं.