अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नुकताच 'फुलवंती' हा सुपरहिट सिनेमा दिला. मात्र आता ती वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. बीड मध्ये सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणात प्रतिक्रिया देताना परळी पॅटर्न म्हणत भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं. यावरुन प्राजक्ताने थेट त्यांची महिला आयोगात तक्रारच केली. तसंच पत्रकार परिषद देत राजकारण्यांना खडेबोल सुनावले. यानंतर इंडस्ट्रीतून अनेकांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला. 'फुलवंती' सिनेमातील तिचा सहकलाकार गश्मीर महाजनीनेही(Gashmeer Mahajani) यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गश्मीर महाजनीने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी सेशन' घेतलं. यावेळी त्याला चाहत्याने विचारलं, 'प्राजक्ताच्या समर्थनार्थ काय बोलशील?' याला उत्तर देत गश्मीर म्हणाला, "मला या संपूर्ण प्रकरणामागची गोष्ट माहित नाही कारण मी माझ्या कामात व्यस्त आहे. पण मला जितकं प्राजक्ताबद्दल माहित आहे ती खूप खंबीर, स्वतंत्र आणि सशक्त स्त्री आहे. त्यासाठी मी तिचा आदर करतो."
गश्मीर महाजनीने 'फुलवंती' सिनेमात शास्त्री बुवाची भूमिका साकारली. प्राजक्तानेच हा सिनेमा निर्मित केला होता. प्राजक्ता माळीला आतापर्यंत सचिन गोस्वामी, सुशांत शेलार, विशाखा सुभेदार, कुशल बद्रिके, मेघा धाडे, पृथ्वीक प्रतापसह काही कलाकारांनी पाठिंबा दिला आहे.