नृत्यांगनागौतमी पाटील (Gautami Patil) आणि वाद हे जणू समीकरणच झालं आहे. गौतमीच्या कार्यक्रमावरुन काही ना काही गोंधळ होणार हे ठरलेलंच असतं. कधी हुल्लडबाजांमुळे कार्यक्रम थांबवावा लागतो तर कधी पोलिसांच्या मध्यस्थीमुळे कार्यक्रमावर गदा येते. नुकताच गौतमीचा पुण्याच्या औंध परिसरात कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रम तर सुरळीत झाला पण मग नेमकं बिनसलं कुठे? तर यावेळचा हा वाद आता कार्यक्रमाच्या जागेवरुन झाला आहे आणि त्यामुळे पोलिसांना प्रश्न विचारले जात आहेत.
गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम म्हटलं की जोरजोरात गाण्यांचा आवाज, प्रेक्षकांच्या शिट्ट्यांचा, गोंधळाचा आवाज होणं साहजिकच आहे. पुण्याच्या औंध परिसरात १७ मे रोजी गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाला तुफान गर्दी होती. काहीही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम सुरळीत पार पडला. पण नंतर पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले गेले. याचं कारण होतं ते म्हणजे हा कार्यक्रम औंधच्या एम्स रुग्णालयाहून (AIMS hospital)काही पावलं अंतरावर आयोजित करण्यात आला होता. अशा सायलेंट झोनमध्ये गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एम्सच्या बाजूलाच कार्यक्रम घ्यायची काय गरज होती असं म्हणत लोकांनी संताप व्यक्त केलाय. परवाच नाशिक जिल्ह्यातही गौतमीच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. दिवसेंदिवस तिचा कार्यक्रम म्हणजे पोलिसांसाठी डोकेदुखीच ठरत चाललाय हे नक्की.