धुळे – सबसे कातील गौतमी पाटील म्हणून अवघ्या महाराष्ट्राच्या तरुणांना वेड लावणारी नृत्यांगना गौतमीचे वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी समोर आली आहे. ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी साडेपाच वाजता सूरत बायपास हायवेवर एक व्यक्ती बेवारस अवस्थेत स्थानिकांना आढळली. स्थानिकांनी स्वराज्य फाऊंडेशनशी संपर्क साधला. त्यानंतर स्वराज्य फाऊंडेशनचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले आणि तिथून तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने संबंधित व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
स्वराज्य फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात पोहचल्यानंतर संबंधित व्यक्तीचा फोटो काढून ती व्यक्ती कोण आहे यासाठी व्हायरल केला. ओळख पटवण्यासाठी हा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर १० मिनिटांत १०० हून अधिक कॉल कार्यकर्त्यांना गेले. ही व्यक्ती गौतमी पाटील यांचे वडील आहेत अशी माहिती लोकांनी दिली. तोपर्यंत कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती. तरीही याची खात्री न पटल्याने रात्री नातेवाईकांशी संपर्क झाला. त्यांना प्रत्यक्ष येऊन तुम्ही शहानिशा करा असं कार्यकर्त्यांनी सांगितले.
त्यानंतर नातेवाईक समक्ष रुग्णालयात पोहचले आणि संबंधित व्यक्ती गौतमी पाटीलचे वडीलच आहेत असं त्यांनी सांगितले. अद्याप गौतमी पाटील यांच्याशी आमचा काहीही संपर्क झाला नाही. त्यांच्याकडूनही आम्हाला संपर्क झाला नाही. ज्या अवस्थेत रुग्ण आम्हाला सापडले त्याठिकाणी आणखी अर्धा ते पाऊण तास उशीर झाला असता तर संबंधित व्यक्ती दगावले असते अशी माहिती स्वराज्यच्या कार्यकर्त्यांनी दिली. या अवस्थेत आम्ही त्यांना रुग्णालयात आणले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.
दरम्यान, आम्हाला रात्री उशीरा माहिती मिळाली. एका मेसेजसोबत फोटो आला होता. आम्ही नाशिकहून इथे आलो आहे. संबंधित व्यक्ती माझे दीर आहेत. गौतमी पाटील ही त्यांची मुलगी आहे. गेल्या दहा बारा वर्षापासून त्यांच्याशी काही संपर्क नाही असं महिला नातेवाईकांनी सांगितले.