‘अलबत्त्या गलबत्त्या’ हया यशस्वी नाटकानंतर निर्माते राहुल भंडारे यांच्या अद्वैत थिएटर्सचं “निम्मा शिम्मा राक्षस” हे नवं कोरं बालनाट्य लवकरच रंगभूमीवर येत आहे. सध्या रंगभूमीवर तुफान सुरू असलेल्या ‘अलबत्त्या गलबत्त्या’ हया विश्वविक्रमी नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडविला. निर्माते राहुल भंडारे, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा “निम्मा शिम्मा राक्षस” हया बालनाट्यासाठी एकत्र आले आहेत.
रत्नाकर मतकरी लिखित “निम्मा शिम्मा राक्षस” हया नाटकाचे निर्माते राहुल भंडारे असून दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे. हया नाटकातील तीन गाणी स्वत: चिन्मय मांडलेकर यांनी लिहिली असून जसराज जोशी यांच्या आवाजात आपल्याला ही गाणी ऐकायला मिळणार आहे तर मयूरेश माडगावकर यांनी ही गाणी संगीतबद्ध केली आहेत.
गायत्री दातार, अंकुर वाढवे आणि मयूरेश पेम हे मुख्य भूमिकेत असून त्यांच्या अभिनयाचा आविष्कार हया नाटकात पाहायला मिळणार आहे. हया नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे हया नाटकात प्रेक्षकांना नाट्य अवकाशाचं थ्रीडी स्वरूप अनुभवता येणार आहे. ‘तुला पाहते रे’ हया लोकप्रिय मालिकेतील इशाच्या भूमिकेत गाजलेली अभिनेत्री गायत्री दातार प्रथमच हया नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करीत आहे. हया नाटकात ती शहजादीच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘चला हवा येऊ द्या’ हया कार्यक्रमात तसेच अनेक नाटकात दिसणारा ऊंची लहान पण कीर्ती महान अभिनेता अंकुर वाढवे हया नाटकात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अनेक नाटक, चित्रपट तसेच ‘ऑल द बेस्ट’ हया नाटकातून तरुणाईच्या हृदयात घर करून बसलेला तरुण अभिनेता मयूरेश पेम हया नाटकात अब्दुल्लाच्या मुख्य भूमिकेत दिसेल. नाव जरी ‘निम्मा शिम्मा राक्षस’ असले तरी मनोरंजनाचे फुल पॅकेज हया नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.