रितेश देशमुख (Ritesh Deshmukh )आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) हे सर्वाधिक लोकप्रिय मराठमोळं कपल. या कपलचे अनेक चाहते आहेत. रितेश भाऊ अन् जिनिलिया वहिनींची गोष्टच न्यारी.. त्यामुळे जिथे कुठे जाईल तिथे या जोडप्याची चर्चा होते. मग झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा कसा अपवाद ठरेल? नुकताच रितेश व जिनिलियाचा ‘वेड’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमानं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. याच ‘वेड’ चित्रपटासाठी जिनिलियाला झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात (Zee Chitra Gaurav Puraskar 2023) गौरविण्यात आलं. पुरस्कार घेण्यासाठी जिनिलिया मंचावर आली आणि मग काय? जिनिलियाने आपल्या अहोंना अशी काही गोड हाक मारली की त्याचीच चर्चा रंगली.पुरस्कार स्वीकारल्यानंतर जिनिलियाने नवरोबा रितेश देशमुखचे विशेष आभार मानले. अहो, अशी प्रेमळ हाक तिने मारली. जिनिलियाने प्रेमाने मारलेली ही हाक ऐकून रितेशही लाजला. त्याने बायकोला फ्लाइंग किसही दिला.
“अहो, तुम्ही मला श्रावणी दिली. मी तुम्हाला हे अवॉर्ड दिलं. लव्ह यू”, असं जिनिलिया म्हणाली आणि रितेशला राहावलं नाही. तो सुद्धा मंचावर गेला. जिनिलियाने मोठ्या प्रेमाने आपल्या हातातला अवार्ड रितेशच्या हाती दिला आणि यानंतर रितेश लगेच जिनिलियाच्या पाया पडला. रितेश-जिनिलीयाच्या या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
जिनिलियाने तब्बल 10 वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. या कमबॅकसाठी जिनिलियाने तिने ‘वेड’ या मराठी सिनेमाची निवड केली. यात तिने साकारलेली श्रावणीची भूमिका प्रचंड गाजली. रितेशने रंगवलेला सत्याही लोकांना भावला. ‘वेड’च्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शनात पाऊल टाकलं. ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले.