Join us  

Akash Thosar : 'परश्या' नव्या हिरोईनसोबत करणार रोमान्स; पाहा, आकाश ठोसरचा नवा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:10 AM

Ghar Banduk Biryani, Akash Thosar : होय, सगळ्यांचा लाडका परशा अर्थात आकाश ठोसर पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय...

 'सैराट', 'फँड्री', 'झुंड', 'नाळ' नंतर दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) एक नवाकोरा सिनेमा येत्या एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'घर बंदूक बिरयानी' असं या सिनेमाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला होता. तेव्हापासून या सिनेमाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. काही तासांत या सिनेमाचं पहिलं गाणं गुनगुन प्रेक्षकाच्या भेटीस येत आहे. काल या गाण्याचा टीझर रिलीज झाला आणि प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पाेहोचली. या गाण्यात आकाश ठोसर (Akash Thosar) पुन्हा एकदा रोमँटिक अंदाजात दिसतोय. त्याच्यासोबत एक नवी हिरोईनही सिनेमात आहे. सायली पाटील असं तिचं नाव. सायली व आकाशचा गाण्याच्या टीझरमधील रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहून चाहते क्रेझी झाले आहेत.

'व्हॅलेंटाइन्स डेच्या आदल्या दिवशीच प्रेमाचा रंग चढणार, प्रत्येकाचं मन गुनगुननार. प्रेमाची चाहुल देणारं 'घर, बंदूक, बिरयानी' या आगामी चित्रपटातलं पहिलं गाणं #गुनगुन येतंय उद्या', असं कॅप्शन देत आकाशने गाण्याचा टीझर शेअर केला आहे. काही महिन्यांपूर्वीच हेमंत अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पोलीस आणि डाकू यांच्यातील चकमक यात दिसत होती. हे नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागलेली असतानाच आता या सिनेमाचं  एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यात सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

येत्या 7 एप्रिलला 'घर बंदूक बिरयानी' सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती यासोबत देण्यात आली आहे. 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमात आकाश ठोसर व सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत. शिवाय सयाजी शिंदे (Sayaji shinde) आणि नागराज मंजुळे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सुरुवातीला हा सिनेमा ३० मार्च २०२३ मध्ये प्रदर्शित होणार होता, तशी घोषणाही करण्यात आलेली. मात्र अचानक प्रदर्शनाची तारीख बदलून ७ एप्रिल २०२३ करण्यात आली. रिलीज डेट पुढे ढकलण्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र अजय देवगणच्या 'भोला' सिनेमामुळे 'घर बंदूक बिरयानी'ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :आकाश ठोसरनागराज मंजुळेमराठी चित्रपट