Join us  

कोकणातील गणेशोत्सव, परंपरा, कुटुंबातील मतभेद अन्...; 'घरत गणपती' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 4:52 PM

कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा एक आगळा वेगळा मराठी सिनेमा 'घरत गणपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

कोकणातील गणेशोत्सव आणि परंपरा हा कायमच जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. गणेशोत्सवातील कोकणातील मज्जा मस्ती आणि परंपरा आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा एक आगळा वेगळा मराठी सिनेमा 'घरत गणपती' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा होती. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता 'घरत गणपती' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 

'घरत गणपती'  सिनेमातून एक वेगळा आणि महत्त्वाचा विषय हाताळला गेला आहे. कोकणात गणपतीनिमित्त संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतात. असंच घरत कुटुंबही गणपतीच्या निमित्ताने या सिनेमात एकत्र आलेलं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. कोकणातील गौरी-गणपतीत केली जाणारी मज्जा-मस्ती, परंपरा या सिनेमातून दाखविण्यात आल्या आहेत. कोकणतील गणेशोत्सव अनुभवण्यासाठी या घरत कुटुंबात क्रिती अहुजा ही अमराठी मॉडर्न मुलगी येत असल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. त्यानंतर ती या कुटुंबाचाच एक भाग होत असल्याचंही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. कोकणातील पद्धती आणि परंपरा शिकून घेण्याचा प्रयत्न करताना ती दिसत आहे. 

गणेशोत्सवाबरोबरच कुटुंबातील मतभेद आणि हेवेदावे यांवरही 'घरत गणपती'  सिनेमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. संवाद आणि गाण्यांमुळे सिनेमाला वेगळाच टच मिळाला आहे. या ट्रेलरमुळे 'घरत गणपती' सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

'घरत गणपती'  सिनेमा येत्या २६ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात भूषण प्रधान, अश्विनी भावे, अजिंक्य देव, शुभांगी गोखले, संजय मोने, शुभांगी लाटकर, परी तेलंग, समीर खांडेकर या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. अभिनेत्री निकिता दत्ता या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नवज्योत बंदिवाडेकर यांनी केलं आहे. 

टॅग्स :भुषण प्रधानमराठी अभिनेतासिनेमाअजिंक्य देवअश्विनी भावे