गिरीश कलकर्णी सांगतात, अभिनेत्याचे जीवन जगताना चांगला श्रोता होणे महत्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2017 12:45 PM
आजचे समकालीन वास्तव पहाता टिकाऊ असे काहीच राहिलेले नाही. काही मोजक्याच लोकांमुळे वैचारिक साहित्य हे टिकत आहे. तंत्रज्ञान म्हटले, कि ...
आजचे समकालीन वास्तव पहाता टिकाऊ असे काहीच राहिलेले नाही. काही मोजक्याच लोकांमुळे वैचारिक साहित्य हे टिकत आहे. तंत्रज्ञान म्हटले, कि टाईम आणि अवकाश या व्यक्तीवादाकडे मानवास ढकलले जाते. हे चुकीचे आहे. समाजाचे होत असलेले सांस्कृतिक कुपोषण थांबविणे ही काळाची गरज बनली आहे, असे परखड मत अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. अभिनेत्याचे जीवन जगताना चांगला श्रोता होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मानवास चांगले अनुभव, चांगली विचार दृष्टी प्राप्त होते. एखादे काम प्रखर इच्छाशक्तीने पूर्ण केल्यास त्याला यश निश्चित मिळते. आणि त्या कामाला चांगले अनुभव आणि चांगली विचार दृष्टी पूरक ठरते.माध्यम आणि राजकारण या जुळलेल्या समीकरणालाही त्यांनी भाषणात लक्ष्य केले. माध्यमांच्या भूमिकेमुळे राजकारण्यांचे आजकाल बरेच फावत आले आहे. राजकारणी वेळोवेळी माध्यमांची कास पडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करतात. नागरिकांना नको नको त्या उत्सवात अडकवून ठेवतात. लष्कराच्या भाक-या भाजणा-या अशा राजकारण्यांमुळे पैसा प्रविष्ठ बनला आहे. माणसातील माणूसकी हरवली जात आहे. त्यांना प्रश्न विचारणा-यांचे प्रमाण कमी होत आहे. समाजातील सर्व चांगल्या गोष्टींना राजकारण्यांनी पैसा कमविण्याचे एकप्रकारे साधनच बनविले आहे. या अभिनेत्याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. नुकतेच गिरीश कुलकर्णी याने दंगल या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवुडसह मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले आहे. त्याचबरोबर काबील या चित्रपटातूनदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. वळू, विहीर, देऊळ, मसाला, पुणे ५२, पोस्टकार्ड, हायवे, जाऊ दया ना बाळासाहेब या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.