सिनेक्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मुलींनी भूमिका मिळविताना कॉम्प्रमाईज करू नये - अलका कुबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 04:01 PM2020-05-07T16:01:42+5:302020-05-07T16:06:57+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ठाणे : सिनेक्षेत्रात पदार्पण करताना नवोदित कलाकार विशेषतः मुलींना वाईट अनुभव येत असतात. परंतु त्यांनी भूमिका मिळावी यासाठी कोणत्याही तडजोडी न करता ठामपणे नकार द्यायला शिकावे, त्यांनी मी टू होऊ देता कामा नये असा मूलमंत्र ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी दिला. आमच्यावेळी देखील अशा गोष्टी होत्या पण आम्ही नकार दिला अआणि त्या गोष्टींकडे कधीच वळलो नाही असे अनुभवाचे बोलही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा, त्यांना चांगले विचार ऐकता यावे यासाठी आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्यावतीने संवाद मनाचा या कार्यक्रमात कुबल यांची झूम व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुलखात घेण्यात आली. प्रा. मंदार टिल्लू यांनी अनेक प्रश्न विचारून त्यांना बोलते केले. कुबल यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगत आपला सिनेसृष्टीचा प्रवास उलगडला. कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर ठेवा, सिने सृष्टीत यश मिळाले आणि डोक्यात हवा गेली की काळ चांगला असेपर्यंतच तुम्हाला विचारतात त्यानंतर लोकांना तुमची आठवण येत नाही. पण तुम्ही माणूस म्हणून चांगले असाल तर त्याचा फायदा होतो. हल्ली कलाकार एखाद्या मालिकेत प्रसिद्ध झाला की त्याच्या डोक्यात यश जाते. पण मालिकेतील यश हे त्या भूमिकेचे असते आणि नाटक, सिनेमांत मिळालेले यश हे तुमचे, तुमच्या नावाचे असते, रंगभूमीवर तुमचा पाया भक्कम असावा, मेहनत करण्याची तयारी असावी, माणसे ओळखण्याचा अनुभव आणि संयम, मनाने कणखर असावे. प्रत्येकाला यश मिळतेच असे नाही असा सल्लाही त्यांनी दिला. प्रत्येक भूमिकेकडे आव्हान म्हणून पाहावे आणि ती स्वीकारावी असे सांगताना त्या म्हणाल्या, सैराट हा चित्रपट तरुणांनी जास्त पहिला पण माहेरची साडी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने पहिला. माहेरची साडी सिनेमाने त्यावेळी केलेल्या कमाईची आताच्या काळात किंमत काढली तर ती 450 ते 500 कोटी होईल. त्या चित्रपटाचे रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाही. त्या चित्रपटाला मिळालेले यश हे संपूर्ण युनिटचे यश होते. चित्रपट चालला की जसे संपूर्ण युनिटचे यश असते तसे तो पडला तरी ते श्रेय संपूर्ण युनिटचेच असते. माहेरच्या साडीमुळे मला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले अशी आठवण त्यांनी सांगितली. त्या काही काळ ठाण्यात वास्तव्यास होत्या यावेळी त्यांनी या शहराच्या आठवणी सांगताना ठाण्याच्या प्रेक्षकांचे भरभरून कौतुक केले. अशोक सराफ, निळू फुले, स्मिता पाटील, शरद तळवळकर यांच्याकडून खूप शिकायला मिळाले असे सांगत त्यांच्याप्रती त्यांनी आदरही व्यक्त केला. मालिकापेक्षा मला नाटक आणि सिनेमा जास्त आवडतात. नाटकात प्रेक्षक समोर पाहायला मिळतात. त्यांकच्याकडून मिळालेली दाद, त्यांनी व्यक्त केलेल्या भावना या प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात तर सिनेमा हे नेहमीच मला आव्हान वाटतो. हल्ली लहान वयातच मुला मुलींची प्रेमप्रकरण सुरू असतात याबद्दल नाराजी व्यक्त करताना त्या म्हणाल्या, प्रेम करणे गुन्हा नाही. परंतु आपण आधी शिक्षण, करिअरकडे लक्ष द्यावे. आपण स्वतःच्या पायावर उभे आहोत का याचाही विचार करावा. तुमचे चारित्र्य जपा आणि ध्येय बाळगा म्हणजे आयुष्यात सगळे मिळेल असा संदेश ही त्यांनी शेवटी दिला. यावेळी ज्येष्ठ लेखक, प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. हर्षदा लिखिते देखील सहभागी झाले होते.