काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'गुलकंद' या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून प्रसाद ओक - ईशा डे यांचीही अफलातून जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
'गुलकंद'च्या टीझरमध्ये काय?
'गुलकंद' सिनेमाच्या टीझरमध्ये ढवळे आणि माने जोडप्यांच्या नात्याचा प्रवास रेखाटला आहे. सई - समीरमधील गोड संवाद आणि प्रेमळ नाते दिसत आहे तर दुसरीकडे प्रसाद - ईशा यांच्यातील गंमतीशीर नोकझोक दिसत आहे. हलक्याफुलक्या, गंमतीशीर प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक देखील यात पाहायला मिळतेय. संवादांची सहजता, पात्रांची केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांच्या मनात या फॅमकॉम चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली असून टिझरच्या शेवटी प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांच्या नजरेने मात्र प्रेक्षकांच्या मनात प्रश्नही निर्माण केला आहे.
कधी रिलीज होणार 'गुलकंद'?
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. १ मे २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील बहुतेक सर्व कलाकार सचिन गोस्वामी दिग्दर्शित सिनेमात पाहायला मिळणार आहेत.