Join us

रंगभूमीवर ‘गुमनाम है कोई’, मधुरा वेलणकर-साटम साकारणार प्रमुख भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 1:12 PM

मधुरा वेलणकर-साटमसह अंगद म्हसकर, शैला काणेकर, प्राजक्ता दातार गणपुले आणि रोहित फाळके यांच्याही या नाटकात लक्षवेधी भूमिका आहेत.

गेल्या काही महिन्यांत रंगभूमीवर अनेक दर्जेदार आणि उत्तम नाट्यकृती आल्या. या सर्व नाटकांना नाट्यरसिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला. विविध विषयांना हात घालणाऱ्या नाटकांना रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. डिसेंबर महिन्यात तर अनेक नवनवीन नाटकांची घोषणा होत आहे. यंदा डिसेंबरमध्ये दरवर्षीपेक्षा जास्त नाटकं  रसिकांच्या भेटीला येत आहे. अशाच आणखी एका नव्या नाटकाची घोषणा करण्यात आली असून आघाडीची नाट्यनिर्मिती संस्था भद्रकाली प्रॉडक्शन्स नवं नाटक रंगभूमीवर घेऊन येत आहे. गुमनाम है कोई असं या नाटकाचं नाव असून या नाटकात अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम प्रमुख भूमिका साकारणार आहे. नुकतंच या नाटकाचा पहिला लूक सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. गुमनाम है कोई हे एक वेगळ्या धाटणीचे, सस्पेन्स थ्रिलर नाटक आहे. यांत मधुराचा हटके अंदाज पाहायला मिळणार असल्याचे पहिल्या लूकमधून जाणवतंय.भद्रकली प्रॉडक्शन्सतर्फे प्रसाद कांबळी हे नाटक सादर करत असून शिल्पा नवलकर यांनी नाटकाची कथा लिहिलीय. मधुरा वेलणकर-साटमसह अंगद म्हसकर, शैला काणेकर, प्राजक्ता दातार गणपुले आणि रोहित फाळके यांच्याही या नाटकात लक्षवेधी भूमिका आहेत. दिग्दर्शनाची धुरा मंगेश कदम आणि नेपथ्याची जबाबदारी प्रदीप मुळ्ये पार पाडणार आहेत. २२ डिसेंबर २०१८ रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गडकरी रंगायतन, ठाणे इथं पार पडणार आहे तर दुसरा प्रयोग सोमवारी २४ डिसेंबर २०१८ ला दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले इथं रंगणार आहे.