अतिशा नाईक आणि शशांक शेंडे यांचा बंदूक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2017 5:24 AM
अस्सल गावरान शिव्या या विशिष्ट बोली भाषेचा वापर बंदूक्या या चित्रपटात करण्यात आला आहे. "काय गं डंगरे, कशाला नाचतीस?....तुझ्या ...
अस्सल गावरान शिव्या या विशिष्ट बोली भाषेचा वापर बंदूक्या या चित्रपटात करण्यात आला आहे. "काय गं डंगरे, कशाला नाचतीस?....तुझ्या आईच्या वरातीत नाचती"; अशी तुफान डायलॉगबाजी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. बंदूक्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राजेंद्र बोरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन राहुल मनोहर चौधरी यांनी केले आहे. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बंदूक्या सिनेमाने सहा नामांकनं आणि चार राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या पुरस्कारांमुळे या सिनेमाची उंची नक्कीच उंचावली आहे. अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकूटे, निलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची भाषाच निखळ मनोरंजन करणारी आहे. 'बंदूक्या' हा वेगळ्या धाटणीचा तसेच मनोरंजनाच्या नेहमीच्या चौकटी बाहेरचा सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.बंदूक्या या चित्रपटाच्या नावावरूनच देखील या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची कथा ग्रामीण जीवनावर आधारित असल्याने या चित्रपटाचा बाजच खूप वेगळा असणार आहे. हा चित्रपट १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे.