Join us

'गुरू हा आजच्या काळातील अंतर्मनाचा जीपीएस'; महेश काळेने व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 11:45 IST

Mahesh Kale: गुरू म्हटला की तो अमूक एका क्षेत्रातील नसतो. तुमचे संपूर्ण जीवन घडवण्याचे त्यांचे दायित्व असते. चांगले गुण पारखून, दुर्गुणांचा नायनाट करण्याचे कार्य गुरू करतात.

संजय घावरे

मुंबई : आपणा सर्वांच्या आत एक दिशादर्शक होकायंत्र म्हणजेच आजच्या काळातील जीपीएस आहे. त्या जीपीएसला मी देव मानतो. डोळे मिटा आणि आपला जीपीएस कोणती दिशा दाखवतोय याचा विचार प्रत्येक तरुणाने प्रामाणिकपणे करा. थोर भारतीय संस्कृतीत जन्मल्याने आपण सर्व अत्यंत भाग्यवान आहोत. हे भाग्य दर्शवणे, टिकवणे आणि साजरे करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. परंपरा जपण्याचा हा आनंद सोहळा खऱ्या अर्थाने सुखावणारा असल्याचे मत ख्यातनाम गायक महेश काळेने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत 'लोकमत'शी संवाद साधताना केले.

जगभरातील तमाम संगीतप्रेमींसोबत वारकरी संप्रदायातील तरुण गायक-वादकांचा आयकॅान असलेला महेश म्हणाला की, 'गुरू गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय। बलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय।।' या दोह्यामध्ये आपल्या जीवनातील गुरुंचे महत्त्व वर्णन केले आहे. देव आणि गुरू हे दोघे जर समोर उभे ठाकले, तर अगोदर कोणाच्या पाया पडायचे? या प्रश्नाचे उत्तर यात आहे. दैवत्वाची अनुभूती करून देणारे गुरू असल्याने सर्वात अगोदर त्यांचे दर्शन घेईन असे सांगण्यात आले आहे. आध्यात्मिक गुरू असोत, वा संगीतातील गुरू असोत... गुरुंचे आपल्या परंपरमध्ये खूप मोठे महत्त्व काहे. गुरू म्हटला की तो अमूक एका क्षेत्रातील नसतो. तुमचे संपूर्ण जीवन घडवण्याचे त्यांचे दायित्व असते. चांगले गुण पारखून, दुर्गुणांचा नायनाट करण्याचे कार्य गुरू करतात. माझे गुरू पं. जितेंद्र अभिषेकीबुवा वर वर्णलेल्या दोह्याप्रमाणेच होते. ते माझे गायनातील गुरू आहेत, पण त्यांनी माझे पूर्ण जीवनच पालटले. शाळेत असल्यापासून त्यांच्याकडे गाणे शिकताना अभिषेकीबुवांच्या सान्निध्यात राहिल्याने माझ्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. प्रामाणिकपणा, विनम्रपणा, समाजाशी बांधिलकी जपणे या गोष्टी त्यांच्याकडून आल्या आहेत.

महाराष्ट्राला थोर संत परंपरा लाभलेली आहे. एकीकडे संत ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकाराम-नामदेव महाराजांपर्यंत अठरा पगड जातीतील संतांनी गुरुंच्या रूपात आध्यात्मिक विचारांची बैठक दिली आहे. अलिकडेच अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम केला, तेव्हा क्षेत्र महात्म्याची जाणीव झाली. स्वामींनी वापरलेल्या वस्तू पाहताना भारावून गेलो. संतांनी अवतार घेतला आणि आपले काम करून ते निजधामाला गेले. 'गेले दिगंबर ईश्वर विभूति।। राहिल्या त्या किर्ती जगामाजी।।' याप्रमाणे आजही त्यांची किर्ती मागे आहे. उस डोंगा परी रस नोहो डोंगा, धन्य देवा तुझी नारळाच्या आत पाणी, तुका म्हणे जग वेडे। उस टाकूनी खायी वाडे।। या साध्या आणि सुंदर प्रमाणांद्वारे संतांनी जगाला शिकवण दिली आहे. संतांचिया गावी प्रेमाचा सुकाळ, अबीर गुलाल उधळीत रंग, आम्हा नकळे ज्ञान, हरिभजनाविन काळ, संतभार पंढरीत असे असंख्य अभंग मनावर कोरले गेले आहेत.

अमेरिकेतील गुरुपौर्णिमा

अमेरिकेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी लांबून मला विद्यार्थी भेटायला येतात. मराठी, परप्रांतीय, परदेशी अशी वेगवेगळी शिष्य मंडळी आहेत, पण सर्वांना गुरुंचे महात्म्य पटलेले आहे. मी केवळ गाण्यापुरतेच प्रशिक्षण मर्यादित न ठेवता कलेसोबतच आपली संस्कृती जपण्याचीही शिकवण देतो. माझा गुरुपौर्णिमेचा सोहळा ६ ऑक्टोबरला आईच्या पुण्यतिथीच्या दिवशी साजरा करतो. प्रथम अभिषेकीबुवा, माझी आई आणि वडिलांचा फोटोंच्या पूजन होते. त्यानंतर गाणी, मनोगते, स्नेहभोजनाचा कार्यक्रम होतो. खूप मोठा सोहळा केला जातो. 

टॅग्स :महेश काळेसेलिब्रिटीसिनेमासंगीत