Join us

​'हा' बाल कलाकार झाला आता सिनेमॅटोग्राफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2016 5:07 PM

शाहरुख खान, प्रिती झिंटा स्टारर कल हो ना हो या चित्रपटामध्ये एका छोट्या कलाकारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

शाहरुख खान, प्रिती झिंटा स्टारर कल हो ना हो या चित्रपटामध्ये एका छोट्या कलाकारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रितीच्या लहान भावाची भूमिका साकारलेल्या या मराठमोळ्या मुलाचे नाव आहे अतिथ नाईक. सध्या अतिथची सिनेवर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण त्याचे काही फोटोज आता व्हायरल झाले आहेत. चित्रपटामध्ये अगदी साधा दिसणारा अतिथ आता एकदमच कुल डूड झाल्याचे पहायला मिळतेय. खरेतर भारतीय हॅरी पॉटर म्हणून अथित नाईकला ओळखले जाते. मुंबईचा हा मराठमोळा मुलगा अथित आता मोठा झाला असून सध्या इंडस्ट्रीत पडद्यामागे सिनेमॅटोग्राफीचे काम करतोय. विशेष म्हणजे गेल्या वर्षी ६७ व्या फेस्टिव्हल द कान्समध्ये त्याच्या एक नव्हे तर दोन लघुपटांची निवड झाली होती. जगभरातल्या फिल्ममेकर्ससाठी हा फेस्टिव्हल अतिशय मानाचा समजला जातो. एरव्ही शूटिंग करताना ट्रॉलीवर कॅमेरा ठेवला जातो. मात्र अथितने त्याच्या लघुपटांचे शूटिंग हातात कॅमेरा धरुन केले होते. अथित सध्या लॉस एंजिलिसमध्ये फिल्ममेकिंग शिकत आहे. लॉस एंजिलिस आणि फिलिपिन्समधून अथितने सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. जेमी फॉक्ससारख्या अनेक बड्या सेलिब्रिटींच्या म्युझिक व्हिडिओजसाठी त्याने सिनेमॅटोग्राफी केली आहे. बालकलाकार म्हणून अथितने २ टीव्ही शो, ७ बॉलिवूड फिल्म्स आणि १७२ जाहिरातींमध्ये काम केले आहे. 'कल हो ना हो' सिनेमा रिलीज होऊन नुकतीच १३ वर्षे उलटली आहेत. अथित जरी आता सिनेमॅटोग्राफी करीत असला तरी त्याला बॉलिवूडचे दरवाजे अजूनही खुले आहेत. त्यामुळेच जर तो लवकरच एखाद्या बॉलिवूड चित्रपटातून अभिनेता म्हणून प्रेक्षकांना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.