Join us

“हा! मी मराठा” लवकरच प्रेक्षकांंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 6:37 AM

कॉलेज जगतातील अनेक आठवणी आपल्या मनात आयुष्यभर घर करून असतात. कॉलेज आणि कॉलेजचे दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. ...

कॉलेज जगतातील अनेक आठवणी आपल्या मनात आयुष्यभर घर करून असतात. कॉलेज आणि कॉलेजचे दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. मग त्या मित्रांच्या गोष्टी असोत किंवा शिक्षकांच्या असोत..आपण नंतर कितीही वर्षांनी आपल्याला त्या नक्कीच आठवतात. अशाच प्रकारचे कथानक असलेला अॅक्शनपट “हा! मी मराठा” येत्या २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माते अमृता राव, आकाश राव, सहनिर्माते मोहन सचदेव  यांनी आपल्या स्पंदन फिल्मस् आणि रेमोलो एंटरटेनमेंट निर्मितीसंस्थे अंतर्गत या सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे असून या सिनेमात अनिकेत विश्वासराव आणि प्रियांका यादव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यांच्या सोबत विशाल ठक्कर, यतीन कार्येकर, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आशिष पवार, सविता प्रवीण, मेघा घाडे आणि भूषण कडू आपल्याला दिसणार आहेत.मिलिंद नारायण, गुरु शर्मा  यांनी सिनेमाला संगीत दिले असून गाण्यांना वैशाली सामंत, कैलाश खेर, शान, सुनिधी चौहान या गायकांचा आवाज लाभला आहे. कथा निहारिका यांची असून पटकथा आणि सवांद प्रदीप राणे यांचे आहे. सिनेमाची गोष्ट शिवा पाटीलच्या भोवती गुंफण्यात आली आहे. साधा, भोळा असला तरी हा शिवा हुशार आहे. त्याच्या आईच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तो मुंबईतल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो आणि तिथूनच या सिनेमाची सुरुवात होते. कॉलेजमधील गंमतीजंमती सोबत अनेक गोष्टी या सिनेमात बघायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवून शिवाच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळते. शिवा अन्यायाविरुद्ध लढा द्यायला तयार होतो आणि पुढे काय होते त्यासाठी सिनेमा बघावा लागणार आहे.शिवरायांचा इतिहास आणि त्याचा शिवाच्या जीवनावर कसा परिणाम घडून येतो हे पाहण्यासाठी तुम्हाला “हा! मी मराठा!!” सिनेमा पाहावा लागेल.