प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अमोल कागणे फिल्म्सच्या 'हलाल' चित्रपटात मानाचा तुरा खोवला गेला आहे. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा अशा विविध विभागांमध्ये एकूण आठ नामांकने पटकावली. अमोल कागणे फिल्म्सची पहिलीच निर्मिती असलेल्या 'हलाल' चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले. राज्य पुरस्कारांसह बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये चित्रपटाचा गौरव झाला होता. आता फिल्मफेअरसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्येही चित्रपटाने नामांकने मिळवली.
शिवाजी लोटन पाटील यांना दिग्दर्शनासाठी क्रिटिक्स नामांकन, प्रियदर्शन जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी क्रिटिक्स नामांकन, प्रीतम कागणेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री क्रिटिक्स नामांकन आणि पदार्पणासाठीही नामांकन मिळालं. तसंच चिन्मय मांडलेकरला सहायक अभिनेत्यासाठी, मौला मौला गाण्यासाठी सईद अख्तर आणि सुबोध पवार यांना सर्वोत्कृष्ट गीतासाठी, राजन खान यांना सर्वोत्कृष्ट कथेसाठी आणि निशांत ढापसे यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी नामांकन मिळाले.
फिल्मफेअर पुरस्कारांविषयी लहानपणापासून मनात कुतुहल आहे. या पूर्वी अनेकदा हा सोहळा टीव्हीवर पाहिला आहे. आता आपल्या चित्रपटासाठी फिल्मफेअरसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे नामांकन मिळणे ही फारच आनंदाची गोष्ट आहे. आजवर चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी फिल्मफेअरची नामांकने नक्कीच स्पेशल आहेत, अशी भावना निर्माता अमोल कागणे यांनी व्यक्त केली.
मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक आशय परिणामकारकरीत्या लोकांपर्यंत पोचवता येतो. या उद्देशानेच मुस्लीम स्त्रियांची व्यथा हलाल चित्रपटाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना निर्माते अमोल कागणे यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी नेहमीच आपल्या कलाकृतींमधून सामाजिक प्रश्नांचा माणसांच्या जगण्याचा वेध घेतला आहे. ‘समाज बदलतोय असं आपण म्हणतो पण खरंच समाज बदलतोय का? आजही अनेक समस्या व त्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत.
दिग्दर्शक या नात्याने या सामाजिक समस्येकडे लक्ष वेधण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिला असल्याचे’, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी यावेळी सांगितलं. ‘सामाजिक भान जपणाऱ्या कलाकृती समाजासमोर आवर्जून यायला हव्या असं सांगत अशा कलाकृतींमध्ये काम करायला मिळणं हे भाग्याचं असल्याचं’, मत सर्वच कलाकारांनी यावेळी व्यक्त केलं.