मराठीत सिनेमा नवनवीन प्रयोग केले जात आहेत. मराठी सिनेमाचा डंका राज्यात, देशातच नाही तर सातासमुद्रापार वाजतो आहे. लहानग्यांच्या भावविश्वाचा कॅनव्हास रेखाटणाऱ्या व्हिडिओ पॅलेस निर्मित व समित कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ या मराठी चित्रपटाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपलं नाव मोठ्या दिमाखात कोरलं. आता आणखी एक मानाचा तुरा 'हाफ तिकीट'च्या शिरपेचात रोवला गेला आहे. 'हाफ तिकीट' लवकरच चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. चीनमध्ये प्रदर्शित होणारा 'हाफ तिकीट' हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार हे विशेष. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. हा चित्रपट मराठीतच पाहता येणार असून त्याला चिनी सबटायटल्सची जोड असणार आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दाक्षिणात्य चित्रपट 'काक मुत्ताई'चा मराठी रिमेक असलेल्या 'हाफ तिकीट'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला असंख्य चित्रपट महोत्सवांमधून केवळ नावाजलेच गेले नाही तर अनेक पुरस्कारही मिळाले. दोन भावांच्या जिद्दीची त्यांच्या संघर्षाची ही गोष्ट क्षणिक भौतिक सुखांचा मागोवा घेते. शुभम मोरे, विनायक पोतदार या दोन बालकलाकारांच्या सहज-सुंदर अभिनयाला भाऊ कदम, प्रियांका बोस, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, कैलाश वाघमारे आदि दिग्ग्ज कलाकारांची उत्तम साथ लाभली आहे.
'हाफ तिकीट' पुढल्या एक-दोन महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज असून ''या चित्रपटाच्या निमित्ताने चीनसारखी मोठी बाजारपेठ आता मराठी चित्रपटांसाठीसुद्धा खुली झाली आहे हे सांगण्यास मला आनंद होत आहे'', असं निर्माते नानूभाई जयसिंघानी यांनी सांगितले तर ''माझ्यासाठी व माझ्या संपूर्ण टीमसाठी हा सुवर्णक्षण असून मराठी चित्रपट आज जागतिक स्तरांपर्यंत पोहोचत असल्याचं पाहून मला खूप आनंद होत आहे'' असं दिग्दर्शक समित कक्कड यांनी आपलं मत व्यक्त केलं. जागतिक स्तरावर आपली दखल घेण्यास भाग पडणाऱ्या 'हाफ तिकीट' या दर्जेदार मराठी चित्रपटाने मराठी मनोरंजन क्षेत्रात नवचैतन्य फुलवलं आहे हे नक्की.