तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधून राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी हा महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. या भूमिकेमुळे त्याला एक उत्तम संधी आणि यश मिळालं खरं, पण हार्दिकला त्यासाठी खूप परिश्रम देखील घ्यावे लागले. घरच्यांपासून लांब राहून कोल्हापुरात शूट करायचं होतं, याशिवाय स्वतःचा व्यायाम व आहाराकडे लक्ष द्यायचे होते. हार्दिकने मात्र हे आव्हान खूप चांगल्यारीत्या पेलले. कोल्हापुरातल्या व्यायाम शाळेत मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली हार्दिक त्याचे डाएट प्लान व वर्कआऊट डिझाइन करतो. तुझ्यात जीव रंगला या मालिकेला ३ वर्षं पूर्ण झाली.
याच मालिकेसाठी हार्दिकला तीन वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या. राणा दा, राजा राजगोंडा आणि कॉन्स्टेबल रणविजय गायकवाड! पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही भूमिकांसाठी हार्दिकने स्वतःच्या अभिनयावरच नाही तर शरीरावरसुद्धा मेहनत घेतली. राणाची भूमिका कुस्तीपटूची असल्यामुळे हार्दिकने १५ किलो वजन वाढवलं होतं तेच आता रणविजय गायकवाड या भूमिकेसाठी १५ दिवसांत ८ किलो वजन त्याच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली कमी केले. अर्थात या मेहनत व जिद्द यांचा मोलाचा वाटा आहे.
सकाळी ९ ची शिफ्ट असली तर सकाळी ६ वाजता व्यायामशाळेत जाऊन दीड ते २ तास हार्दिक व्यायाम करतो. किंवा मग कधी-कधी ७ ची शिफ्ट असली तर संध्याकाळी ७-८ ला पॅकअप झाल्यावर रूमवर न जाता थेट व्यायामशाळेत जाऊन तो व्यायाम करतो. या भूमिकेसाठी हार्दिक खूप कष्ट करतोय आणि ते तो करू शकतोय कारण रसिकांकडून त्याला शाबासकीची थाप मिळत आहे म्हणूनच. रोज शूटला जाताना प्रोटिन शेक्स, प्रोटीन बार्स, फळं, सुकामेवा हार्दिक घेऊन जातो.
आता जेव्हा तो राणाची भूमिका करत होता तेव्हा अरबट-चरबट खाणं सोडून सर्व प्रकारचे पौष्टिक अन्न खात होता. पण आता कॉन्स्टेबल गायकवाडच्या भूमिकेसाठी त्याने हे सगळं कमी केलं आहे. थोड्या प्रमाणात भात बंद, नाचणीच्या भाकऱ्या. हार्दिक सध्या अत्यंत हेल्दी डाएटवर आहे. इतके दिवस बाहेर राहिल्यावर आपण प्रत्येकजण घरचं जेवण खूप मिस करतो. घरी आल्यावर तुपातली पोळी, बटाटा कचऱ्याची भाजी, हिरवी चटणी, वरण, भात हा हार्दिकचा अत्यंत आवडता बेत आहे. थोडक्यात सांगायचं तर हार्दिकने भूमिकेसाठी खूप कष्ट घेतले आहे आणि भूमिकेत त्याचा जीव रंगला असं म्हंटल तरी खोटं ठरणार नाही.