मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे ९ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे गिरगावमधील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन भावुक झाला आहे आणि त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांत्वन करणाऱ्यांचे आभार मानले. त्याची पोस्ट शेअर करत त्याची आई आणि प्रदीप पटवर्धन यांची पूर्वाश्रमीची पत्नी सुवर्णरेहा जाधव यांनीदेखील ही पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट केली आहे.
श्रीतेज पटवर्धन म्हणाला की, ‘कळण्यास अत्यंत दुःख होत आहे की, दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७च्या सुमारास माझे वडील कै. प्रदीप शांताराम पटवर्धन यांचे आमच्या झावबावाडी, गिरगाव येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर त्याचदिवशी दुपारी ३ वाजता चंदनवाडी, गिरगाव येथील स्मशानभूमीत शास्त्रशुद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. हे सर्व विधी त्यांचा एकलुता एक मुलगा ह्या नात्याने उपस्थित कुटुंबियांच्या समवेत पार पाडले.
त्याने पुढे लिहिले की, माझ्या वडिलांचे हे असे अचानक जाणे सगळ्यांसाठीच धक्कादायक होते. वयाच्या ६५ व्या वर्षी सुद्धा ते अत्यंत सक्रिय होते. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता. अगदी आदल्या दिवशी सुद्धा ते एका नाट्य स्पर्धेचे परीक्षक होते. आमच्यावर कोसळलेल्या ह्या दुःखद प्रसंगात, आम्हाला धीर देणाऱ्या, सांत्वन करणाऱ्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या उपस्थित राहणाऱ्या सर्वांचेच आम्ही मुलगा श्रीतेज पटवर्धन, माझी पत्नी सौ निकिता पटवर्धन, माझी आई श्रीमती सुवर्णहेरा जाधव आणि माझे काका श्री सुधीर शांताराम पटवर्धन ऋणी आहोत. माझ्या वडिलांचे, त्यांचं कार्यक्षेत्र आणि अभिनय यावर निस्सीम प्रेम होतं. त्यांनी कायमच रंगभूमीची सेवा मनोभावे केली. त्यांचे हेच विचार आम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे कारण, ‘द शो मस्ट गो ऑन’!.