'तुला कळणार नाही'ने जिंकली रसिकांची मने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 9:09 AM
मानवी भावभावनांचा 'आरसा' मांडणारे सिनेमे मनात घर करून जातात. दिग्दर्शकाची सर्जनशीलता आणि ताकदीचा विषय या दोहोंमुळे यशस्वी ठरलेल्या मराठी ...
मानवी भावभावनांचा 'आरसा' मांडणारे सिनेमे मनात घर करून जातात. दिग्दर्शकाची सर्जनशीलता आणि ताकदीचा विषय या दोहोंमुळे यशस्वी ठरलेल्या मराठी सिनेमांच्या यादीत 'तुला कळणार नाही' या सिनेमाचादेखील आता आवर्जून उल्लेख करावा लागणार आहे. कारण ८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रसिकांच्या हृदयात आपले स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला असून पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी या चित्रपटाने २४.५ लाखांची कमाई केली. तर शनिवारी ३७ लाख आणि रविवारी ४९ लाख कमावले असून हा आकडा एकूण १ करोड १० लाख इतका झाला आहे. सुबोध आणि सोनालीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा वैवाहिक दाम्पत्यांच्या भावविश्वावर भाष्य करतो. लग्न होऊन चार-पाच वर्षं झालेल्या विवाहित जोडप्यांचा जणू बायोपिकच यात मांडला असल्याचे दिसून येते. प्रेमाचा गुलमोहोर लग्नाच्या अनेक वर्षानंतर जेव्हा गळून पडतो, तेव्हा ती रिक्त जागा भरून काढण्यासाठी 'सॉरी' आणि 'थँक्स' हे दोन शब्द कामी येतात. नेहमीचे वाद आणि भांडणामुळे दुरावलेल्या नात्याला पुन्हा रिस्टार्ट करण्याची गरज आली आहे असा सल्ला हा सिनेमा देतो. नवरा-बायकोच्या नात्यातील भावनिक बंध अधिक दृढ करण्यास हा सिनेमा यशस्वी होत असून सुखी संसाराची सूत्रे मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या चित्रपटात केला आहे. शिवाय राहुल अंजलीच्या या लग्नानंतरच्या प्रेमकथेत टप्प्याटप्प्यांवर आपणास नवनवीन कलाकार देखील भेटतात. ज्यात सुशांत शेलार, जयवंत वाडकर, संग्राम साळवी, उदय टिकेकर, उदय नेने, निथा शेट्टी, रसिका सुनील, अनुराधा राज्याध्यक्ष यांचा समावेश असून या कलाकारांनी देखील आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेल्या या सिनेमाला स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदार, अर्जुन बरन आणि श्रेया योगेश कदम या निर्मात्यांची मोठी नांदी लाभली असून नीरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. Also Read : जाणून घ्या सुबोध भावेने कशी केली सोनाली कुलकर्णीची मदत