विनोदाचा बादशहा समजले जाणारे ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धन (pradeep patwardhan) यांचं आज निधन झालं. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप पटवर्धन यांचं असं अचानक निघून जाणं हा सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकालाच बसलेला धक्का आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्येच अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) हिने प्रदीप पटवर्धन यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे प्रदीप पटवर्धन यांनी प्रत्येकाला आपलंसं केलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधन प्रत्येकाच्या मनाला चटका लावू गेलं आहे. यात हेमांगीने त्याच्या आठवणींना उजाळा देत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.काय आहे हेमांगीची पोस्ट
"मी पहिल्यांदा कुठल्या अभिनेत्याला आताच्या भाषेत 'celebrity' ला पाहिलं असेल तर ते प्रदीप पटवर्धन होते. कळव्यात कुलकर्णी नावाचे dentist आहेत अगदी माझ्या घराच्या kitchen च्या खिडकी समोर त्यांचं clinic. दुपारची 4 ची वेळ होती आणि माझ्या आईने चहा करत असताना उंचपुऱ्या देखण्या पुरुषाला clinic मध्ये शिरताना पाहिलं. मला आईने बोलवुन घेतलं आणि सांगितलं अगं त्या clinic मध्ये प्रदीप पटवर्धन शिरलेत बहुतेक. मी म्हटलं ह्या काही काय? एवढा मोठा माणूस इथं कशाला येईल? आई म्हणाली अगं नाही तेच आहेत. शहानिशा करायला म्हणून मी गेले clinic जवळ आणि तेवढ्यात clinic चं दार उघडून एक प्रचंड handsome व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर चालत आलं. पहिला अभिनेता ज्याला मी इतकं जवळून पाहिलं होतं. काळजात धस्स झालं. काय बोलावं काय करावं सुचेना. आठ नऊ वर्षाची मी त्यांना बघून घाबरून पळून आले आणि आईला सांगितलं अगं तेच आहेत!!!!! दुसऱ्या दिवशी शाळेत मी जाम shining मारली होती", असं हेमांगी म्हणाली.
पुढे ती म्हणते," मग त्यानंतर अनेक वेळा त्यांना त्या clinic मध्ये जाताना येताना पाहिलं. खूप वर्षांनी या क्षेत्रात आल्यावर त्यांच्या सोबत काम करायची संधी ही मिळाली. जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा हा किस्सा त्यांना सांगितला. मी म्हटलं "मी तुम्हांला पाहिलं होतं लहानपणी" त्यावर पट्या काका म्हणाले "कुणाच्या लहानपणी?", "माझ्या की तुझ्या?" मी म्हटलं "अहो माझ्या" तर त्यांच्या विशिष्ट अशा style मध्ये मानेला झटका देऊन म्हणाले "हां मग ठिके, मी उगाच घाबरलो!" माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही पण घरी आल्यावर कळलं त्यांना काय म्हणायचं होतं! असा मिश्किल, handsome आणि timing चा बादशाह पट्या काका उर्फ प्रदीप पटवर्धन! आठशे खिडक्या नवशे दारं वरचा तुमचा dance म्हणजे ओहोहो! "