हेमांगी कवी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत तिने काम केलं आहे. हेमांगी अभिनयाबरोबरच तिच्या व्यक्तिमत्वासाठीही ओळखली जाते. समाजातील अनेक गोष्टींवर हेमांगी परखडपणे तिचं मत व्यक्त करताना दिसते. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच हेमांगीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'लोकमत फिल्मी'ला खास मुलाखत दिली.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत हेमांगीने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. हेमांगीला मालिकेच्या सेटवर सहकलाकाराकडून वाईट अनुभव आला होता. हा प्रसंग तिने लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत शेअर केला. ती म्हणाली, "एका मालिकेच्या सेटवर मला सहकलाकाराकडून वाईट अनुभव आला होता. तेव्हा मी दिग्दर्शकाला जाऊन सांगितलं. तेव्हा मला दिग्दर्शकानेही साथ दिली. आणि त्या सहकलाकाराला मालिकेतून काढून टाकलं. मला वाटतं आपल्यासोबत घडणाऱ्या या गोष्टींबद्दल आपण बोललं पाहिजे. पण, प्रत्येकवेळी आपल्यातील दुर्गाच बाहेर आली पाहिजे असं नाही."
"आपल्यामुळे कुणाचं नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे. आता मी याला धडाच शिकवते, असं करता कामा नये. सहकलाकाराची दिग्दर्शकाकडे तक्रार करताना मी १० वेळा विचार केला. कारण, माझ्यामुळे उगाच कोणाचं नुकसान होता कामा नये. मी पाच-सहा एपिसोड केल्यानंतर त्या कलाकाराची तक्रार केली. त्यानंतर दिग्दर्शकांनी त्याला काढून टाकलं. मला वाटतं बायकांचा सिक्स सेन्स हा नेहमीच जागा असतो," असंही हेमांगी म्हणाली.