आपल्या अभिनयाने चित्रपट आणि रंगभूमीवर रसिकांची मने जिंकलेली अभिनेत्री हेमांगी कवी. . सोशल मीडियार नेहमी ती आपली मतं ठामपणे मांडत असते. पुन्हा एकदा हेमांगीने अशाच एका मुद्द्याला हात घातल आहे. नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपण आता बोलु लागलो आहे. पण नेहमीच एका मु्द्द्याकडे दुर्लक्ष केले जाते. ब-याचदा महिलांना कामाच्या ठिकाणी उपलब्ध असणारे टॉयलेट वापरण्यात अडचणी येतात. एक भली मोठी पोस्ट शेअर करत तिने निर्भिडपणे आपले विचार मांडले आहेत.
तिने म्हटले आहे की, हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट असतात. त्यात काही कॉमन टॉयलेट म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकच टॉयलेट असतं. अशावेळी ते कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहानवयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं. अत्यंत गरजेचा विषय आहे समजून! पुरुष मूत्र विसर्जन करताना कमोडच्या रिंगवर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अशा घाणेरड्या कमोडवर त्या कशा बसत असतील? बसत नसतील तर मग कशा मॅनेज करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळीच्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का?
होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी! #Commode कसं वापरावं हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही हेल्थशी असतो! सगळ्यांनी या विषयी उघडणपे बोलावं ! कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर फ्लशही करत नाहीत... अरे काय? एक बटन दाबायचं असतं फक्त... तेवढं ही होऊ नये आपल्याकडून? बरं ते दिवसभर पुन्हा आपल्यालाच वापरायचं असतं. असो...तर कमोड, वेस्टर्न टॉयलेट कसे वापरावे याची आपल्याला गुगल करून माहिती मिळवता येईल पण आपल्यातला साधं फ्लश बटनही पुश करता येत नसल्याचा आळस बघता इथे मी मला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुरुषांनी मूत्र विसर्जन करताना कमोडची रिंग (frame) वर करून आपला कार्यभाग उरकून फ्लश करून झाल्यावर पुन्हा ती फ्रेम टॉयलेट सीटवर पाडायची असते. कमोड सीट स्वच्छ, कोरडं कसं राहील याकडे लक्ष द्यावं! व्यवस्थित #flush झालंय की नाही ते पाहावं जेणे करून दुर्गंधी येऊन जीव गुदमरून जाऊ नये याची खात्री करून मगच बाहेर पडावं. काही पुरुष आम्ही ती रिंग वर करू पण पुन्हा ती खाली पाडणार नाही अशा भलताच पुरूषी अहंकार गाजवतात त्यांना कोपऱ्यापासून दंडवत! या गोष्टीकडे आपण कधीच गांभीर्याने पाहत नाही किंवा हसण्याचा, चेष्टेचा विषय म्हणून सोडून देतो... पण त्यामुळे होणारे अनेक त्रास, #infections याकडे अनाहूतपणे आपण दुर्लक्ष करतोय. हे शिकून किंवा समजून घेण्यात काहीच कमीपणा नाही. उलट स्त्रियांचं आरोग्य यावर ही अवलंबून असतं याचा विचार करावा! प्रत्येकाला 'मनासारखं' 'मनोसोक्त' हलकं व्हावंसं वाटत असतं याचा आदर व्हावा एवढीच इच्छा!