Hemant Dhome : महाराष्ट्रातील इगतपुरीजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका वृद्ध मुस्लिम व्यक्तीला सहप्रवाशांनी मारहाण केली. या कथित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला. अखेर महाराष्ट्र शासनाने याची दखल घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावर अभिनेता हेमंत ढोमेने (Hemant Dhome) देखील पोस्ट करत घटनेचा निषेध नोंदवला.
जेव्हा हा व्हिडीओ समोर आला होता, तेव्हा हेमंत ढोमेनं अजित पवारांना टॅग करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानं लिहलं होतं, "नका रे नका...आपल्या महाराष्ट्रात हे सगळं करू नका! विचलित आणि सुन्न करणारं आहे हे चित्र! आपला महाराष्ट्र असा नव्हता आणि असा होऊ द्यायचा नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार का? अजित पवार तुम्ही तरी कठोर कारवाई कराल बाकी लोकांकडून अशा अपेक्षा नाहीत".
अखेर अजित पवारांनी ट्विट करत दोषींवर कारवाई करण्यात येत असल्याचं सांगितलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. अशा असामाजिक घटकांना आमच्या महायुती सरकारकडून कोणताही थारा मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अजित पवारांचं ट्विट पुन्हा शेअर करत हेमंत ढोमेनं त्यांंचे आभार मानले.
हेमंत ढोमेनं लिहलं, "खूप खूप धन्यवाद दादा! आम्हाला खात्री आहे आपण स्वतः लक्ष घालून अपराध्यांना कठोर शिक्षा मिळवून द्याल! जेणेकरून आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं वागण्याची कोणाची पुन्हा हिंमत होणार नाही! आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच!". दरम्यान, अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) नेदेखील संबंधित घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत निषेध केला होता.
काय आहे घटना ?
व्हायरल व्हीडिओमध्ये डझनभर लोक ट्रेनमध्ये एका व्यक्तीवर हल्ला आणि शिवीगाळ करताना दिसून आले. जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील अश्रफ अली सय्यद हुसैन हे कल्याण (ठाणे) येथील आपल्या मुलीच्या घरी जात होते. दरम्यान, इगतपुरीजवळ ते गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून सहप्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली. व्हिडीओ समोर आल्यानंतर या घटनेची ठाणे रेल्वे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. ठाणे पोलिसांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीसमोर तक्रार नोंदवून घेतलेली आहे. रेल्वे स्थानकाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे.