दररोज कोरोनामुळे शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागत आहे.दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढत असतानाचा सारेच या संकटापासून कधी सुटका होईल याचीच प्रार्थना करत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. स्मशानभूमीतही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोरोनामुळे वाढलेल्या मृत्युने स्मशानभुमीत मृतदेहाची रांग लागल्याचे विदारक दृष्य पाहायला मिळालं. नुकतेच दिल्लीत आणखी मन हेलावून टाकणारी घटना घडली. दिल्लीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढत असताना बागेचे रुपांतर स्मशानभूमीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता हेमंत ढोमेने याविषयी दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्याने स्मशानात रूपांतरित केलेल्या बागेचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिलं, 'बाग म्हणजे... खेळायची जागा, आज्जी आजोबांनी आपल्याला फिरायला नेऊन गोष्टी सांगायची, चिऊताई, खारुताई बघायची जागा... साळुंखीची जोडी शोधायची जागा... तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं... पण आपण सारे मिळून या राक्षसाला हरवू! पुन्हा बागडायला आपल्या फुलांच्या बागा मिळवू!' असा सकारात्मक संदेशही दिला आहे.
वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशाशनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक मराठी कलाकार कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत. इतरांनाही धीर देत आहेत. तसेच सुरक्षित राहा, मास्क लावा, घरातच राहा असे आवाहनही करताना दिसत आहेत.