हेमंत ढोमे (Hemant Dhome) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. 'झिम्मा', 'झिम्मा २', 'सनी', 'सातारचा सलमान', 'बघतोस काय मुजरा कर' या सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याने केले आहे. हेमंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
हेमंत ढोमेने स्वतःचा फेट्यामधील फोटो शेअर करत आगामी चित्रपटाबद्दल अपडेट दिली आहे. त्याने लिहिले की, उद्या होणार फसक्लास! हा फोटो आहे मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर माझ्या माणसांनी केलेल्या सत्काराचा! त्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव आहे आणि माझाही त्यांच्यावर! बोलता बोलता माझी भाषा तिथली होते आणि पण लगेच तिथला होतो… प्रचंड प्रेम, आपुलकी आणि खूप जास्त आदर हा मला माझ्या गावाविषयी लहानपणापासूनच होता म्हणजे सगळ्यांनाच असतो… पण मला जरा जास्तच आहे!
त्याने पुढे म्हटले की, मला कायम वाटायचं माझं गाव आणि आजूबाजूचा परीसर खूप सुंदर आहे! लहानपणी कुठे माहित होतं आपण मोठे झाल्यावर दिग्दर्शक होऊ, निर्माता होऊ? पण आता माझा सातवा चित्रपट लिहिताना, दिग्दर्शित करताना आणि माझी आणि क्षितीची म्हणजे आपल्या चलचित्र मंडळीची चौथी निर्मिती असताना मी आणि क्षितीने मनाशी ठरवलं होतं हा चित्रपट आपल्या गावीच बनवायचा… आपल्या भागातले लोक घेऊन आपल्या भागातच चित्रीत करायचा!
पाटलांचा नवा सिनेमा
त्याने लिहिले की, गंमत बघा माझ्या लाडक्या टिमसोबत आम्हाला आपला हा चित्रपट स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत शुट करता आला! लय भारी वाटलं राव!!! आता तो पुर्ण झालाय आणि लवकरच तुमच्या भेटीला येतोय… कधी, कसा ते सगळं उद्या सांगतोच! पण माझ्या अत्यंत जवळचा विषय… मी जे जगलो, जे पाहिलं अनुभवलं ते सगळं मांडायचा प्रयत्न केलाय… हळू हळू पुढच्या कथांमधून सुद्धा मांडत राहिनच! तर मंडळी माझ्या मातीचा अभिमान आता तुम्हा सगळ्यांना हक्काने सांगायचाय…कोणीतरी म्हणलेलच आहे, “सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो” तर आता वेळ आलीय हे तपासून बघण्याची… तुमच्यासमोर हक्काने पुन्हा एकदा थोडसं चाचपडायची… तर उद्या सग्गळं “फसक्लास” होणार! #पाटलांचा_नवासिनेमा