हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेला आणि मराठी कलाकारांची तगडी फौज असलेला 'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'झिम्मा २' नंतर हेमंत ढोमेच्या या 'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक होते. एक परिपूर्ण कुटुंब आणि मनोरंजनाची मेजवानी असलेला हा सिनेमा २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. प्रदर्शित होताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हाऊसफूल झाला आहे.
'फसक्लास दाभाडे' सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करताना दिसत आहेत. सिनेमाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून हेमंत थक्क झाला आहे. त्याने प्रेक्षकांचे आभार मानत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. हेमंतने थिएटरमधला क्षिती जोगसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. "राजवाडे नको… महाल भरजरी…सुखाची लागे इथेच गोड भाकरी…आमचा ‘फसक्लास दाभाडे!’ तुम्ही आपला केलात…तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप आभार! हे पुढचं लिहायला खूप भारी वाटतं राव…सर्वत्र हाऊसफुल गर्दीत सुरू! चलचित्र मंडळीची बॅाक्स ॲाफिसवर हॅट्रिक!!!", असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
हेमंत ढोमेचा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही फसक्लास!
'फसक्लास दाभाडे'चं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'फसक्लास दाभाडे' सिनेमाने भारतात जवळपास २८ लाखांचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात सिनेमाने ३१ लाख कमावले आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी 'फसक्लास दाभाडे' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाल्याचं दिसतंय.
'फसक्लास दाभाडे'मध्ये कलाकारांची फौज
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरीश दुधाडे, उषा नाडकर्णी, राजन भिसे या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.