आतापर्यंत राज्यभरात शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपल्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पुन्हा उपोषणास बसले आहेत. त्यामुळे राज्यभरात मराठा आंदोलनाचा गंभीर होत चालला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता कलाकारही भाष्य करत आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री अश्विनी महांगडेने मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे. आता मराठी अभिनेता हेमंत ढोमेने मराठा आरक्षणाबद्दल ट्वीट केलं आहे.
हेमंत ढोमेने मनोज जरांगेंचा उपोषणाचा फोटो त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. "आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय..मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय… त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे! सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत! शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये! जय शिवराय!", असं हेमंत ढोमेने त्याच्या ट्वीटमध्ये म्हणत मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
हेमंत ढोमे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो अगदी परखडपणे त्याचं मत व्यक्त करताना दिसतो. हेमंत लवकरच 'झिम्मा २' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.