Join us

"त्यांचा हा प्रवास नेहमीच प्रेरणादायी असेल", अतुल परचुरेंच्या निधनानंतर डॉ. अमोल कोल्हे भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:16 AM

Atul Parchure : मराठी तसेच हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटविणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं काल निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

मराठी तसेच हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटविणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं काल निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. कर्करोगामुळे अतुल परचुरेंनी अखेरचा श्वास घेतला. नाटक, मालिका, सिनेमे अशा सर्वच माध्यमात अतुल परचुरेंनी विविधांगी भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या परचुरेंनी पुढे अनेक मालिका, सिनेमे ते थेट कपिल शर्माशोपर्यंत उत्कृष्ट भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी अतुल परचुरे यांचा फोटो शेअर करत लिहिले की, अभिनय क्षेत्रातील माझे सहकारी व मित्र, आपल्या कसदार अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे, मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीत ही आपल्या कलेचा ठसा उमटवणारे चतुरस्त्र अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे.

त्यांनी पुढे लिहिले की, बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर नाटक, मालिका, सिनेमा अशा सर्वच व्यासपीठांवर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांचा हा प्रवास आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना मिळो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!

अतुल परचुरे करणार होते कमबॅक, पण...

अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क', 'प्रियतमा', 'वासूची सासू', 'आम्ही आणि आमचे बाप' या नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शिवाय 'आर के लक्ष्मण की दुनिया', 'जागो मोहन प्यारे' सारख्या हलक्याफुलक्या मालिकेत काम केलं.  त्यांनी पु.ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा  'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शोमध्येही त्यांनी सर्वांना खळखळून हसवलं. आता ते पुन्हा 'सूर्याची पिल्ले' या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. 

टॅग्स :अतुल परचुरेडॉ अमोल कोल्हे