Join us

भगवानदादांच्या भूमिकेला मिळालेला 'फिल्मफेअर' हा त्यांचाच सन्मान, मंगेश देसाईंनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 8:50 AM

सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी पुरस्कारांच्या रूपाने मिळालेली पसंतीची पोचपावती खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच दरवर्षी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वातील ...

सिनेसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी पुरस्कारांच्या रूपाने मिळालेली पसंतीची पोचपावती खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच दरवर्षी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वातील कलाकारांचे कौतुक करण्यासाठी विविध पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. मराठी सिनेसृष्टीचा सन्मान करणारा यंदाचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला मराठीच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभली होती. गेल्या वर्षी कित्येक सिनेमांनी मराठी सिनेसृष्टी समृद्ध झाली. भारताच्या पहिल्या डान्सिंग आणि ऍक्शन हिरो भगवान दादा यांचा जीवनपट उलगडणारा 'एक अलबेला' हा त्यापैकीच एक... या चित्रपटात मंगेश देसाई यांनी भगवानदादांच्या रूपात येऊन प्रेक्षकांबरोबरचं समीक्षकांचीही मनं जिंकली आणि या भूमिकेसाठी मंगेश देसाई यांना यंदाच्या फिल्मफेअर ‘’सर्वोत्कृष्ट अभिनेता’’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.या पुरस्कारापूर्वी या सिनेमासाठी मंगेश देसाई यांना स्रिकींन पुरस्कार, स्टेट पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.नृत्याच्या अनोख्या शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भगवानदादांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईटचा काळ गाजवला.या नटाच्या भूमिकेसाठी मंगेश देसाई यांनी त्यांचे जुने चित्रपट पाहून त्यांची शैली आत्मसात करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. या भूमिकेला मिळालेला पुरस्कार हा भगवान दादांनाच मिळालेला पुरस्कार आहे,अशी भावना मंगेश देसाई यांनी व्यक्त केली.त्याचप्रमाणे सई ताम्हणकरसाठी हा पुरस्कार सोहळा खूपच विशेष ठरला.कारण 'फॅमिली कट्टा'साठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा तिला पुरस्कार मिळाला.सईच्या चित्रपट वाटचालीमधला हा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड आहे.फिल्मफेअरचे हे तिसरे वर्ष आहे आणि त्यामुळे तिच्यासाठी हा पुरस्कार विशेष होता.हा अवॉर्ड स्वीकारताना सई खूप भारावून गेली होती.या बाबत सई सांगते,हा माझा पहिला फिल्मफेअर आहे आणि मला याचा खरंच खूप आनंद होत आहे.हा फिल्मफेअर आणखी खास आहे कारण मला हा अवॉर्ड 'फॅमिली कट्टा'सिनेमासाठी मिळाला आहे.हा सिनेमा माझ्यासाठी अनेक पर्सनल कारणांसाठी खास होता,खूप जवळचा होता आणि त्या सिनेमासाठी पुरस्कार मिळणे आणि ते ही पहिला फिल्मफेअर मिळणं हे तर नक्कीच फार आनंददायी असल्याचे सईने सांगितले.Also Read:जीवनाचा संघर्ष शिकविणारा एक अलबेला