आजवर बऱ्याच रंगकर्मींनी रंगभूमीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देत प्रचंड मेहनतीने आणि अडचणींवर मात करत रसिकांची सेवा करण्याचे व्रत जोपासले आहे. याचीच जाणीव ठेवून जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधत दरवर्षी मराठी नाट्य कलाकार संघाच्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मीचा सन्मान केला जातो. यंदा हा बहुमान ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना मिळणार आहे.
२१०४ पासून मराठी नाट्य कलाकार संघाच्या वतीने जागतिक रंगकर्मी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सक्रिय रंगकर्मींचाही हक्काचा एक दिवस असावा, या उद्देशाने रंगभूमीवर सर्वस्व वाहिलेल्या दिग्गजांचा भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर या जागतिक रंगकर्मी दिवशी सन्मान केला जातो, यंदा सर्वांच्या लाडक्या 'आऊ' म्हणजेच उषा नाडकर्णी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी मुलाखतीतून 'आऊं'शी संवादही साधला जाणार आहे. या निमित्त शुक्रवार, २५ नोव्हेंबर रोजी परळ येथील दामोदर नाट्यगृह येथे सायंकाळी ६ वाजता ज्ञानेश पेंढारकर यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.