प्रेमाला वय नसतं किंवा कसलीही मर्यादा नसते. प्रेम भावनेची व्याख्याच निराळी असते, त्यासाठी प्रेमातच पडावे लागते. पुन्हा एकदा प्रेमात पडावे असाच एक झी म्युजिक प्रस्तुत मराठी व्हिडिओ ‘क्षितिजा परी’ नुकताच मराठीतील आघाडीचे अभिनेते अनिकेत विश्वासराव यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. एम. सुधाकर फिल्म्स निर्मित हा म्युझिक व्हिडिओ दुर्गेश पाटील या उमद्या गायकाच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आला असून,त्याच्यावरच तो चित्रित करण्यात आला आहे. महेश मटकर यांच्या संगीताने नटलेल्या या व्हिडिओचे कॅमेरामन सोनी सिंग आहेत. दुर्गेशसोबत व्हिडिओ मध्ये दिसणारी ललना म्हणजे पूजा ठाकूर.
‘क्षितिजा परी’ गाण्यातील हा कलाकार जरी नवीन असला तरीही त्याच्या कामामुळे तो कुठेही नवखा वाटत नाही. जळगाव सारख्या गावातून आलेला हा दुर्गेश जितका साधा तितकाच आपल्या कामाशी प्रामाणिक आहे. त्याने या प्रेम गीताला पुरेपूर न्याय दिला असल्याचे या गाण्यातून दिसून येते. यावेळी दुर्गेश म्हणाला की, मी सहज म्हणून हे गाणे लिहिले, पण ज्यांना ज्यांना ऐकवले त्यांना खूप आवडले म्हणून याचा व्हिडिओ करण्याचे ठरले, आणि मला अभिनयाची आवड असल्याने मीच यात करायला तयार झालो. यानंतर अभिनयाकडेच जास्त लक्ष देणार असल्याचेही दुर्गेश म्हणाला. जळगाव ते मुंबई सिनेमा क्षेत्र प्रवास तसा सोपा नाहीये पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही त्याने नमूद केले.
क्षितिजा परीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिनेता अनिकेत विश्वासराव म्हणाले की, दुर्गेशचा आवाज हा मराठीसाठी दुर्मिळ असा आवाज आहे. दुर्गेश पाटीलच्या रूपाने मराठी सिनेमाला अरिजीत सिंग मिळाला आहे. कोणतीही गोष्ट खऱ्या आणि निर्मळ प्रेम भावनेतून केली तर सर्वांनाच भावते..असंच काहीसं क्षितिजा परी या गाण्याबद्दल मला वाटतं. या संपूर्ण टीमचा उत्साह खरोखर कौतुकास्पद आहे. सुंदर लोकेशन आणि गाण्यातील शब्दांची गुंफण खरोखर पुन्हा एकदा प्रेमात पाडते यात शंकाच नाही. सदर गाणं यु ट्यूबवर उपलब्ध आहे.
क्षितिजा परी हे प्रेम गीत कुलू मनाली सारख्या निसर्गरम्य आणि सुंदर अशा ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे, त्यामुळे हे गाणं अधिकच रोमँटिक झालं आहे, म्हणून ते १८ ते ३० वयोगटातील प्रेक्षकांना जास्त भावेल, असा मला ठाम विश्वास आहे, असं व्हिडिओ दिग्दर्शक एम. सुधाकर यांनी यावेळी सांगितले. एम.सुधाकर यांचा हा पहिलाच मराठी म्युजिक व्हिडिओ असला तरी त्यांनी यापूर्वी दक्षिणेत तमन्ना भाटिया, बॉलीवुडमध्ये वरून धवन, संजय दत्त सारख्या बड्या कलाकारांना कोरिओग्राफ केलं आहे.