Join us

कशी नशिबानं थट्टा मांडली..! लावणी सम्राज्ञीवर आली बसस्टॉपवर भीक मागण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 4:07 PM

सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ही महिला या रावजी बसा भावोजी हे गाणे हातवारे करत गात आहे.

सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत ही महिला या रावजी बसा भावोजी हे गाणे हातवारे करत गात आहे. या महिलेला तुम्ही ओळखळलंत का? ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर (Shantabai Kopargaonkar) आहेत. सध्या त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे सांगितले जात आहे. 

कोपरगाव येथील बस स्थानकावर त्या गेल्या अनेक वर्षांपासून भीक मागत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्या कलावंत असल्याचे समजले. कोपरगावचे बसस्थानक हेच त्यांचे घर बनले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच स्थानिक कार्यकर्त्यांनी शांताबाई यांना हुडकून काढले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शांताबाई कोपरगावकर यांना शासनाने आर्थिक मदत मिळवून द्यावी आणि कलावंतांची दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे. सुरेखा पुणेकर यांनी देखील शांताबाईंना योग्य ती मदत मिळवून द्यावी असे म्हटले आहे.

या घटनेनंतर शांताबाईंचे मानसिक संतुलन बिघडले

शांताबाई कोपरगावकर यांचे सध्याचे वय ७५ वर्षे आहे. एकेकाळी शांताबाईंनी आपल्या लावणी नृत्याने लालबाग परळमधील हनुमान थिएटर गाजवले होते.  त्यावेळी कोपगाव बसस्थानकावर काम करणाऱ्या कर्मचारी अत्तार भाईंशी त्यांची ओळख झाली होती. अत्तार भाईंनी शांताबाईंच्या नावाने तमाशा फड काढला. शांताबाईंना त्यांनी या फडाची मालकीण बनवले होते. महाराष्ट्रात जत्रा यात्रामध्ये शांताबाईंनी अनेक कार्यक्रम सादर केले. बक्कळ पैसा कमावला. पुढे अत्तार भाईंनी त्यांचा तमशा फड विकायला काढला. यात शांताबाईंची मोठी फसवणूक करण्यात आली.

या घटनेनंतर शांताबाईंचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्या बसस्थानकावर भीक मागू लागल्या. पन्नास साठ लोकांचे पोट भरणाऱ्या शांताबाईंची बिकट अवस्था झाली आणि त्या रस्त्यावर आल्या.