जपून जपून जरा पुढे धोका आहे,..म्हणत रसिकांच्या काळजावर अधिराज्य मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. केवळ रुपेरी पडद्यावरील अंदाजातच ती बोल्ड आहे असं नाही तर तिची मतं परखड आणि स्पष्टपणे मांडण्यातही सई तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे. चित्रपटसृष्टीत आणि भूमिकांमध्ये अभिनेत्रींच्या वर्चस्वाबाबत तिने आपली ठाम मतं मांडली आहेत.
अभिनेत्री आता एका ठराविक प्रकारच्या भूमिका साकारत नसून चाकोरीबाहेरील भूमिकांना प्राधान्य देत असल्याचे सईने एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. स्त्रीप्रधान भूमिका असो किंवा एखादी बोल्ड भूमिका प्रत्येक भूमिकेत अभिनेत्री वरचढ ठरत असल्याचे सईला वाटतं. कितीही आव्हानात्मक भूमिका किंवा एखादी सामर्थ्य तसंच प्रभावशाली भूमिका असली तरी तिला अभिनेत्री पूर्णपणे न्याय देत असल्याचे सईने म्हटले आहे.
किती दिवस पुरुष चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवणार असा सवाल सईने उपस्थित केला आहे. अभिनेत्यांनी आता एक पाऊल मागे घ्यावं आणि शांत राहावं असा सल्लाही सईनं चित्रपटसृष्टीतील पुरुषांना दिला आहे. याचा अर्थ चित्रपटसृष्टीत त्यांना स्थानच असू नये असं म्हणत नसल्याचंही तिने स्पष्ट केले आहे. चित्रपटसृष्टीत सध्या उत्तम कलाकृती बनत आहेत. यांत अभिनेता असो किंवा अभिनेत्री यांचा समान वाटा असावा, कुठलाही भेदभाव असू नये हे सांगायलाही सई विसरली नाही.