प्रत्येक कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतो. त्यासाठी त्या भूमिकेचा अभ्यासही तो करतो. वेळ प्रसंगी तो खऱ्या आयुष्यात त्या भूमिकेसारखाच राहण्याचा प्रयत्न करतो. सध्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अनुजा साठे हिची चर्चा रंगली आहे. एक थी बेगम या सीरिजमुळे अनुजा प्रचंड लोकप्रिय झाली. मात्र, तिने साकारलेल्या भूमिकेचा अभ्यास करत असताना तिला थक्क करणारा अनुभव आला. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एका बारबालेला भेटल्यानंतर त्यांचं जीवन किती भयान असतं हे सांगितलं.
"मला ते वातावरण कळावं यासाठी पोलिसांकडून सगळी परवानगी घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. ते मला म्हणाले तू इथे कोणाशीही बोल. तिथल्या बारबालेशी मी जवळपास १ तास गप्पा मारल्या. मी तिला जनरल प्रश्न विचारले. इथे कशी आलीस वगैरे. म्हणजे मला ते सुद्धा विचारायचं नव्हतं. कारण, कोण कोणत्या परिस्थितीमुळे तिथे आलंय हे खूप भयानक असू शकतं. पण ती मुलगी मला इतकी कॉन्फिडन्ट वाटली. अर्थात तिच्या मनात ते कुठेतरी असणार कारण, ती तिला एक मूल होतं. मला तिचं नाव सुद्धा आठवतंय अर्थात ती त्यांची खरी नावं नसतात. तिचा नंबरही आहे माझ्याकडे. ती मला म्हणाली तू मला कधीही फोन कर. तुला काहीही मदत लागली तर बिनधास्त फोन कर", असं अनुजा म्हणाली.
पुढे अनुजा म्हणते, "ती मला म्हणाली मी तर तुमच्या इंडस्ट्रीत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून पण काम केलंय. पण किती पैसे कमावतेस तू?' मी गप्प होते. ती म्हणाली, किती? ५० हजार, ६० हजार, १ लाख, २ लाख. मी एका रात्रीत ते कमावते. मग मी का माझं लाइफ बदलू. मला हे कळत होतं की हे बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर तो मास्क होा. फक्त दाखवायला की आम्ही किती कणखर आहोत. ती म्हणते माझं तर घर आहे मीरा रोडला स्वतःचं. त्यांना त्यांचा अभिमान आहे कारण ते त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतात. स्वतःचं घर उभं करतात. पण ती जे करतेय त्याचा तिला अभिमान नाहीये. त्या दिवशी मी हलले. खूप हलले. तिथून आम्ही ताबडतोब निघालो. म्हणजे आपण हे कल्चर पाहिलं नाहीये असं नाही. चित्रपटात वगैरे आपण पाहतो हे पण त्याची खोली किती आहे हे मला तेव्हा कळलं. याचा कुठेतरी परिणाम होतो."