Join us

कसा असेल करण चा सैराट ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2016 3:08 PM

      priyanka londhe          सैराट या चित्रपटाची झिंग सगळ्यांवर चढलेली दिसत होती. मराठीच ...

      priyanka londhe          सैराट या चित्रपटाची झिंग सगळ्यांवर चढलेली दिसत होती. मराठीच काय तर बॉलिवूडमधील कलाकार देखील सैराटमय झाले होते. सैराट हा चित्रपट अनेक भाषांमध्ये आता तयार होणार असल्याचे दिसतेय. परंतु आता हिंदीमध्ये देखील आपल्याला आर्ची-परशाची ही प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असल्याने आता बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा झिंगाटचे वारे वाहू लागले आहे. भव्य-दिव्य चित्रपटांसाठी ओळखला जाणारा करण जोहर या मराठमोळ्या आणि रांगड्या चित्रपटाला कसे सादर करणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. यावर मराठी कलाकारांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणुन घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 
 
 
 स्मिता तांबे : करण जोहर कोणतीही प्रेमकथा अतिशय सुंदरपणे हाताळतो हे तर आपण त्याच्या प्रत्येक चित्रपटातूनच पाहिले आहे. सैराटची प्रेमकथा जरा वेगळी आहे. करणच्या चित्रपटांमध्ये नेहमीच आपल्याला ग्लॅमर दिसते. परंतु ही प्रेमकथा एका विशिष्ट वर्गाची आहे. आता करण हे त्याच्या हिंदी सैराटमध्ये कशाप्रकारे उतरवतोय हे पाहायला जास्त आवडेल. सैराट हिंदीमध्ये जरी करायचा असेल तरी माझ्यामते त्या चित्रपटात नवीनच कलाकार घ्यायला हवेत. तरच त्या चित्रपटाची मजा राहणार आहे. अतिशय वास्तववादी पद्धतीने हा चित्रपट हिंदीतही मांडला जावा असे मला वाटते.
 
भार्गवी चिरमुले : मला वाटते की सैराटचा रिमेक जर हिंदीमध्ये होणार असेल तर त्यामध्ये नवीन कलाकार घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे त्या चित्रपटामधील फ्रेशनेस कायम राहीन. तसेच करणने त्याच्या नेहमीच्या चित्रपटांमध्ये जशी भव्य-दिव्यता असते तशी न दाखवता साधेपणा या चित्रपटात उतरवायला हवा. जसे आपण सैराटमध्ये गावातील साधेपणा, सुंदर लोकेशन्स पाहिलीत तशाच प्रकारे हिंदीतही तो साधेपणा आणि सुंदर लोकेशन्स असतील तर नक्कीच हा सिनेमा हिंदीतही पाहायला आवडले.  
 
आदिनाथ कोठारे : हिंदीमध्ये जर सैराटचा रिमेक होणार असेल तर नक्कीच नवीन कलाकारांची जोडीच पाहायला आवडेल. करण जोहरची जरी एक स्टाइल असली तरी त्याला माहीत आहे कोणता विषय कसा हाताळायचा. तो एक टॅलेंटेड निर्माता आणि फिल्ममेकर आहे. सैराट हा त्याचा जॉनर नसला तरी तो या कथेला योग्य न्याय देणार याची मला खात्री वाटते. कारण त्याला कॉन्टेन्टची योग्य परख आहे. मला वाट करण सैराटच्या कथेला हिंदीमध्ये देखील तेवढ्याच ताकदीने मांडणार यात काही शंकाच नाही.
 
 सौरभ गोखले : करण जोहर सैराटचा रिमेक हिंदीमध्ये करणार म्हणटल्यावर माझ्या डोळ्यासमोर आर्ची आणि परशाच्या भूमिकेसाठी दोनच नावे आली ती म्हणजे शाहरुख आणि काजोल. परंतु आता जर पाहिले तर आलिया आणि वरुण ही जोडी करणच्या सैराटमध्ये आपल्याला दिसू शकेल. खरेतर करण जोहरच्या चित्रपटातील झगमगाट आणि चकचकाटच पाहायला लोक जातात. आता सैराटचे हक्क जरी त्याने घेतले असतील तरी मला असे वाटतेय करण कथा तीच ठेवेल पण ती वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या चित्रपटांची स्टाइल जर आपण पाहिली तर जमीनदार घराण्यातील प्रेमकथा कदाचित तो दाखवू शकतो.