'संगीत मानापमान' सिनेमाची सध्या सर्वांना उत्सुकता आहे. हा सिनेमा नवीन वर्षात अर्थात २०२५ ला रिलीज होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. पुढील काहीच दिवसांमध्ये सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सध्या सिनेमातील नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सिनेमातील असंच एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं नाव म्हणजे 'ऋतू वसंत'. शंकर महादेवन आणि बेला शिंडेंनी या गाण्यावर त्यांच्या स्वरांचा साज चढवला आहे.
'संगीत मानापमान'मधील नवं गाणं भेटीला
'संगीत मानापमान' सिनेमातील ऋतू वसंत हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. ऋतू वसंत आज रंगला... रतीरंगी मदन दंगला... दंगला.. ऋतु वसंत आज रंगला... असे या गाण्याचे बोल असून शंकर महादेवन आणि बेला शेंडे या दोघांनी हे गाणं गायलं आहे. दिपाली विचारे यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलंय. या गाण्याच्या व्हिडीओ साँगमध्ये वैदेही परशुरामी आणि सुबोध भावे थिरकताना दिसत आहेत. याशिवाय पारंपरिक पोशाखात बेला अन् शंकर महादेवन यांचीही झलक व्हिडीओत दिसतेय.
'संगीत मानापमान' कधी रिलीज होणार?
'संगीत मानापमान' हा सिनेमा संगीतप्रेमींसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे. शंकर एहसान लॉय यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. तर शंकर महादेवन, राहुल देशपांडे, महेश काळे, सावनी रविंद्र, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर या गायकांच्या स्वरांनी नटलेला हा चित्रपट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुबोध भावेने केले आहे. नववर्षाच्या मुहुर्तावर १० जानेवारीला 'संगीत मानापमान' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.